पौड रस्त्यावरील उरवडे फाट्यावरील एका कंपनी मध्ये लागलेल्या आगीत तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचा भडका इतका प्रचंड होता की या १८ जणांना बाहेर पडायची संधी देखील मिळाली नाही. जिथे ते काम करत होते त्याच ठिकाणी त्यांचे मृतदेह आढळले आहेत.
उरवडे मधल्या एसव्हीएस या कंपनी मध्ये आज दुपारी आग लागली. सॅनिटायझर आणि इतर केमिकल बनवणाऱ्या या कंपनी मध्ये साधारण ४५ कामगार कामाला होते. दुपारी अचानक आग लागली तेव्हा बाहेरचा भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर पळून जाता आलं.स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत अक्षरशः भिंत फोडली. बाहेरचा भागात असणाऱ्या सर्वांना स्थानिकांनी मदत करत बाहेर काढलं. पण आतमध्ये लॅब आणि थेट केमिकल असणाऱ्या भागात काम करणारे कर्मचारी मात्र दुर्दैवी ठरले. त्यांना ना पळून जाण्याची संधी मिळाली ना कोणती मदत त्यांचा पर्यंत वेळेत पोहोचू शकली.
तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी ज्या भागात हे कर्मचारी काम करत होते त्याच भागात त्यांचे मृतदेह आढळून आले. एक मृतदेह लॅब मध्ये तर इतर जिथे वॉटर प्युरिफिकेशन च काम सुरू होतं तिथे सापडले. नेहमी प्रमाणे कामावर आलेल्या या कामगारांचं फक्त कोळसा झालेलं शरीर बाहेर आलं.
नेमकी कशामुळे आग लागली काय झालं , इथे पुरेशी अग्निशामक यंत्रणा होती का या सगळ्याची चौकशी आता प्रशासन करतंय. पण दुर्दैवानं या सगळ्या नंतरही हे कर्मचारी परत येऊ शकणार नाहीयेत.