पुणे: राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन केला तर पुण्यातील व्यापारी वर्गाचा त्याला पाठिंबा देतील. मात्र, जर संपूर्ण लॉक डाऊनचा निर्णय घेतला नाहीतर मात्र गुरुवारपासून आम्ही दुकाने उघडणार अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली आहे.
पुण्यात कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकार व प्रशासन यांनी कडक कठोर पावले उचलले होते. यात दिवसा जमावबंदी तर सायंकाळी ६ नंतर कडक संचारबंदीची घोषणा केली होती. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता 30 एप्रिलपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला होता. यावरून पुणे व्यापारी महासंघाने आक्रमक धोरण स्वीकारत प्रशासनाला खुले आव्हान देत दुकाने उघडण्याचा पवित्रा घेतला होता.मात्र,आता व्यापारी महासंघाने थोडी मवाळ भूमिका घेत आपले आंदोलन स्थगित केले आहे. तसेच पूर्ण लॉकडाउन केला तरच सरकारला पाठिंबा देणार मात्र मिनी लॉकडाऊन जर कायम ठेवलातर वेगळा निर्णय घेणार असल्याचे रांका यांनी यावेळी सांगितले
पुणे व्यापारी महासंघाने विभागीय आयुक्त डॉ.सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, यासह सचिव महेंद्र पितळिया यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात व्यापारी वर्ग हजर होता.
रांका म्हणाले, बैठकीत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील कोरोना भीषण परिस्थिती आकडेवारीसह समजावून सांगितली. तसेच आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असेही ते म्हणालेे.त्यामुळे दुकाने न उघडण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घ्यावी अशी विनंती केली. त्याचा मान ठेवत पुणे व्यापारी महासंघाने प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर आपले आंदोलन स्थगित करत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
पुण्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचाच निषेध करत पुण्यातील व्यापारी महासंघाने शुक्रवार पासुन आंदोलन पुकारले होते. शुक्रवारी मानवी साखळी तर आज दुकाने उघडून निषेध करण्यात येणार होता. एक दिवस मुख्यमंत्र्यांना निर्णयासाठी वेळ द्यावा म्हणून त्यांनी सोमवारपासून दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले होते.
.तब्बल दोन-अडीच तास चालेल्या बैठकी प्रशासनाने गंभीर परिस्थितीची जाणीव व्यापाऱ्यांना करून दिली. परंतु गेल्या वर्षी तोट्यात गेलेला व्यापार आता सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊन लागले. व्यापाऱ्यांमुळे कोरोना वाढतो, अशी ओरड केली जाते; पण शहरात अनेक कारखाने, पेट्रोलपंप, रिक्षा, खाद्यपदार्थ, स्टॉल्सवर गर्दी आहे. नियमांचे पालन होत नाही. ज्यांच्यावर बंधने लादायला हवीत, त्यांना बंधने न घालता केवळ व्यापाऱ्यांवर बंधने घालणे हा अन्याय आहे. यामुळे बैठकीत व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनला कडाडून विरोध करत सोमवारी दुकाने सुरू ठेवण्यावर ठाम होते.