पुणे : पुण्यामध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शहरात फक्त पार्सल सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. याचा खुप मोठा फटका बसत असल्याचं मत रेस्टॅारंट चालकांनी व्यक्त केलं आहे. लॉकडाउन मध्येच कशीबशी तग धरली पण आता मात्र कसं जगायचं असा प्रश्न आहे असं मत पुण्यातील रेस्टॅारंट चालकांनी व्यक्त केलं आहे. अनेकांनी रेस्टॅारंट बंद केले तर काहींनी कर्ज काढुन तग धरली होती. आता आणखी बंद करण्याची वेळ येईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
संदीप नारंग यांची पुण्यामध्ये ८ रेस्टॅारंट होती. पण पहिल्या लॅाकडाउनचा फटका इतका होता की त्यांना ३ रेस्टॅारंट बंद करावे लागले. डिलिव्हरीला जास्त स्कोप नसल्यामुळे त्यांनी आजपासून त्याचे हॅाटेल पुन्हा बंद ठेवले आहेत. पण हे किती दिवस चालणार याचा अंदाज येत नसल्याने आहे हे तरी सुरु राहणार का असा प्रश्न त्यांना भेडसावतोय. नारंग म्हणाले “ डिलिव्हरी मध्ये आम्ही ३ हजार स्क्वेअर फुट जागेचे भाडे भरतो आणि अगदी तीनशे स्क्वेअर फुट किचनची जागा वापरतो. मग रेस्टॅारंट सुरु तरी का ठेवायचं असा प्रश्न आहे. आत्तापर्यंत कशीबशी तग धरली आहे. आता मात्र अवघड आहे” असं नारंग म्हणाले.
एकीकडे नारंग यांची ही परिस्थिती आहे. तर दुसरीकडे पुण्यातल्या जंगली महाराज रोड वर शाही भोग नावाचे रेस्टॅारंट चालवण्याऱ्या दर्शन रावळ यांनी तर फेब्रुवारी महिन्यातच रेस्टॅारंट सुरु केले होते. पण १० दिवस होता होता बंधने वाढवायला सुरुवात झाली. आणि आता त्यांना रेस्टॅारंट पुन्हा पुर्ण बंद करावं लागलंय.” दिवसा काठी हजारो रुपयांचे उत्पन्न बुडत असेल तर आम्ही कसं मॅनेज करत असु जरा विचार करा. मी कर्ज काढुन हफ्ते फेडतोय. लाईट बील पण इन्स्टॅालमेंट मध्ये भरतोय. आता पुन्हा उत्पन्न बंद. काय करायचं कळेना. मला यामुळे ॲक्झायटीचा त्रास सुरु झालाय”
युनायटेड पुणे रेस्टॅारंटचे अजिंक्य शिंदे म्हणाले “असं कुठे सिद्ध झालंय की रेस्टॅारंट मुळे कोरोना पसरतो ? आम्ही सरकारने सांगितलेली सर्व नियमावली पाळतोय. मग हे बंधन कशासाठी ? आमचे व्यवसाय कोलमडले आहेत”