पुणे : स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पुण्यातील झोपडपटट्यांमध्ये राबविलेल्या स्वच्छतागृहाच्या उपक्रमाची दिल्लीतील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा करून आयुक्त कुणाल कुमार यांची पाठ थोपटली. पुण्यातील हा उपक्रम देशभर मॉडेल म्हणून राबविण्यात येणार आहे. शहरातील झोपडपटट्यांतर्गत ६० हजार वैयक्तिक स्वच्छतागृहांची उभारणी या उपक्रमांतर्गत करण्यात येत आहे.दिल्लीमध्ये स्मार्ट सिटी, पाचशे गावांच्या विकासाची अमृत योजना आणि गृहनिर्माण योजना या तीन महत्त्वपूर्ण योजनांचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी झाला. या वेळी दिल्लीमध्ये वेगवेगळ्या शहरात राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. पुण्याच्या स्टॉलला नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. या वेळी कुणाल कुमार यांनी त्यांना पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘सॅनिटेशन प्रोग्राम व कम्युनिटी टॉयलेट’ उपक्रमाची माहिती दिली. स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. पुणे महापालिकेने तयार केलेल्या माहितीची पोस्टर्स केंद्र शासनाने छापून घेऊन देशातील सर्व शहरांना पाठविले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणी प्रसंगी या उपक्रमाची दखल घेऊन पुणे मॉडेल सर्वत्र राबविले जावे, असे मत नोंदविले आहे. सीएसआर अंतर्गत १०० शाळांमधून स्वच्छतागृहांची कामे होत असल्याची माहिती कुणाल कुमार यांनी मोदी यांना दिली. शहरात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १९९९ पासून ८५८ ब्लॉक विकसित, पुनर्निर्मित व वापरयोग्य करण्यात आले आहेत, यामध्ये १५ हजारांपेक्षा अधिक सीटस आहेत. त्याचबरोबर १२०० पेक्षा अधिक सिट्स सार्वजनिक स्वच्छता गृहांमध्ये विकसित करण्यात आले आहेत. महिलांच्या स्वच्छता गृहांसाठीही पालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
‘कम्युनिटी टॉयलेट’चे पुणे मॉडेल
By admin | Published: June 26, 2015 4:28 AM