पुणे : सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) हा सामाजिक हिताच्या दृष्टीने केलेला कायदा आहे. कंपन्यांना त्याचे पालन करावेच लागेल, मात्र त्याही पलीकडे जाऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सीरम इन्स्टिट्यूटने हाती घेतलेले पुणे शहर स्वच्छता मोहिमेचे काम आदर्शवत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यातूनच पुणे शहर देशातील सर्वाधिक आदर्श, प्रगत व स्वच्छ शहर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाने पुणे महापालिकेच्या सहकार्याने सुरू केलेल्या आदर पूनावाला क्लिन सिटी या लोकचळवळीचे उद््घाटन आज (गुरूवार) सकाळी फडणवीस यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री गिरीश बापट, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पूनावाला, तसेच भाजपच्या प्रवक्त्या शायनी एस. या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीरमने या मोहिमेसाठी तयार केलेल्या वाहनांचे लोकार्पण केले. फडणवीस यांनी कंपनीने दाखवलेल्या उदार दृष्टिकोनाचा गौरवास्पद उल्लेख केला, ते म्हणाले, ‘‘पुणे शहराला आदर्श बनवण्यासाठी अशा चळवळीची गरज होती. पूनावाला यांनी दाखवलेला हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. उपक्रम सुरू झाला व पुणे शहर स्वच्छ झाले, असे यात होणार नाही. त्यासाठी सातत्याने काम करायला हवे. ते या चळवळीतून होईल.’’कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, ‘‘पुणे शहराला देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर बनवण्याचे ध्येय आम्ही समोर ठेवले आहे. त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याबरोबरच कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्लांट तयार करण्यापर्यंतच सर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. कंपनीने यात १०० कोटी रुपयांची गुुंतवणूक केली आहे. ओला व सुका कचरा जमा करून त्यावर यात प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी कंपनीने तळेगाव, बाणेर येथे जागा घेतली आहे. कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी पालिकेला सर्व पायाभूत सुविधा पुरवण्याचा चळवळीचा उद्देश आहे.’’ आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, ‘‘हे काम लगेच होणारे नाही, हे ओळखून सीरमने पुढे केलेला मदतीचा हात महत्त्वाचा आहे. येत्या वर्षअखेरीस पुणे शहर कचरामुक्त करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. सीरमच्या चळवळीने हा संकल्प पुर्ण होईल.’’ कार्यक्रमाला उपमहापौर आबा बागूल, पालिकेचे भाजपातील गटनेते गणेश बीडकर, मनसेचे राजेंद्र वागसकर तसेच कृष्णकुमार गोयल व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुणे व्हावे सर्वाधिक स्वच्छ व प्रगत शहर
By admin | Published: January 08, 2016 1:45 AM