पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देव गाभार्यात परत येत नाही. तोपर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. अन्नत्याग केल्यानंतर शहराचा कारभार पाहणार कोण हा प्रश्न पडल्याने आम्ही देवाला आवडणारा नैवेद्य घेऊन आलो आहोत. हा देव निश्चित पुन्हा प्रकटेल व पुण्याचे सर्व प्रश्न सोडवेल. अशा निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नरेंद्र मोदी मंदिराच्या जागेवर आरती करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांच्या मंदीराच्या निमित्ताने राष्ट्रवादीने आक्रमक आंदोलन करत भाजपाच्या दैवतीकरणाच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप नोंदवला.
''इथं आल्यानंतर मंदिराचा पडदा काढण्याचा प्रयत्न केला. तर मंदिरामधून मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असा आवाज ऐकू आला यामुळे हा देव निश्चित पुन्हा प्रकटेल व पुण्याचे सर्व प्रश्न सोडवेल कारण गेले साडेचार वर्ष भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी पुण्याचे प्रश्न सोडवले नाहीत. यामुळेच मोदींच्या देव अवतार घेऊन भाजपा पुणेकरांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे असेही कार्यकर्ते म्हणाले आहेत.''
''पुण्यातील महागाईचे तसेच कचरा ,पाणी आदी समस्या नरेंद्र मोदी या देवाच्या प्रकट होण्याने सुटतील असे वातावरण झाले असताना काल रात्री अचानक पणे देव गायब झाला. हा देव देशातील जगातील प्रश्न सोडवू शकतो पण पुण्यातले प्रश्न सोडवू शकत नाही या भीतीने देवाने पळ काढला. असे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितले.''
औंध गावातील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे व आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदी मंदिर उभारलं. परिसरातील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं. या मंदिर उभारणीचं वृत्त देशात चर्चिलं गेलं. यावर बरीच टीकादेखील झाली. त्यानंतर भाजप नेतृत्त्वानं याची दखल घेतली. आज सकाळी औंधमधील मंदिर झाकण्यात आलं. त्यातील मोदींचा पुतळादेखील मुसळे यांच्या कार्यालयात नेण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवण्यात आल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ धाव घेतली. त्यांनी या भागात उपरोधिक आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांकडून आरती करण्यात आली.