पुणे: जी-२० परिषदेचा भारतीय जनता पक्षाने राजकीय कार्यक्रम केला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली. प्रशासनानेही त्यांना हातभार लावल्याचा आरोप करण्यात आला. खासदार वंदना चव्हाण यांनी आमदार, खासदार यांच्यापैकी कोणालाही परिषदेत सहभागी करून घेतले नसल्याचे सांगितले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख यावेळी उपस्थित होते. खासदार चव्हाण म्हणाल्या, जी-२० ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे. सरकारी कार्यक्रम आहे. भारताला त्याचे अध्यक्षपद मिळणे ही गौरवाचीच बाब आहे. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष या परिषदेचे राजकीयीकरण करत आहे. प्रशासनही त्यांचेच सर्व ऐकत आहे. परिषदेच्या पुण्यात बैठका होत असून त्यासाठी पुण्याचे खासदार, आमदार यांनाही साधे निमंत्रणसुद्धा दिलेले नाही. लोकप्रतिनिधी असलेल्यांचे त्यांच्या स्वत:च्या शहराबद्दल काय म्हणणे आहे हे संयोजक म्हणून केंद्र सरकारने ऐकून तरी घ्यायला हवे होते, मात्र प्रशासनावर त्यांचा दबाव असल्याचे दिसते आहे.
महापालिका आयुक्तांना आपण खासदार म्हणून स्वत: सहभाग तसेच शहरात सुरू असलेल्या दिशाहिन सुशोभीकरणाबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांचा ‘सगळे चांगले आहे’ असा आश्चर्यकारक प्रतिसाद आला. हा सरकारी कार्यक्रम आहे तर भाजपने त्यासाठी समन्वय समिती कशी स्थापन केली? राजकीय व्यक्ती नको असे असेल तर मग या तथाकथित समन्वय समितीच्या प्रमुखाला थेट परिषदेत सहभाग कशासाठी? त्यांना तिथे स्थान कसे काय दिले जाते? असा प्रश्न यावेळी शहराध्यक्ष जगताप व प्रवक्ते देशमुख यांनी केला.
खासदार चव्हाण यांनी परिषदेच्या बोधचिन्हावरही आक्षेप घेतला. आंतरराष्ट्रीय परिषदेचे बोधचिन्ह त्यांनी स्वपक्षाच्या राजकीय रंगात रंगवले आहे, खुबीने त्यात चिन्हाचाही समावेश केला आहे. मात्र त्यांनी कितीही पातळी सोडली तरी राष्ट्रवादी काँग्रेस किमान सभ्यता पाळतो, त्यामुळे यावर आपल्याला काहीही बोलायचे नाही, जनतेला सगळे समजते व जनता ते बोलूनही दाखवेल असे चव्हाण म्हणाल्या.
सोमय्या यांना कधीही सिरीयसली घ्यायचे नसते
माजी खासदार किरीट सोमय्या जे बोलतात ते आम्ही सर्वचजण एका कानाने ऐकतो व दुसऱ्या कानाने सोडूनही देता. अनिल देशमुख यांच्या खटल्याबाबत न्यायालयाने काय म्हटले आहे ते पहा. खासदार संजय राऊत यांच्यावरील खटल्याबाबतही न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे मारले आहे. त्यामुळे सोमय्या यांना कधीही सिरीयसली घ्यायचे नसते. - वंदना चव्हाण, खासदार