- विवेक भुसेपुणे : ‘पुणे- मुंबई एक्स्प्रेस-वे’ हा देशातील पहिला ‘एक्स्प्रेस-वे’ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, टोल आकारणीत हा देशातील सर्वांत महागडा महामार्ग ठरला आहे. देशातील कोणत्याही महामार्गावर आकारण्यात येणाऱ्या टोलपेक्षा ‘एक्स्प्रेस-वे’वरील टोल सर्वांत जास्त आहे.येत्या १ एप्रिलपासून येथील टोलमध्ये १८ टक्के वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रति किलोमीटर १.७३ रुपये टोल कारसाठी आकारला जात असताना ‘पुणे- मुंबई एक्स्प्रेस-वे’वर तो कारसाठी प्रति किलोमीटर तब्बल ३.४० रुपये असणार आहे. इतका टोल देशात कोठेही आकारला जात नाही.
‘एक्स्प्रेस-वे’ हा ९४ किलोमीटरचा आहे. १ एप्रिलपासून त्यावर चारचाकीसाठी ३२० रुपये टोल द्यावा लागणार आहे. हे पाहता तो प्रति किमी ३ रुपये ४० पैसे इतका पडतो. त्याच वेळी नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या समृद्धी महामार्गावर ९०० रुपये टोल द्यावा लागतो. हा प्रति किमी १ रुपये ७३ पैसे इतका पडतो. देशभरात अनेक राज्यांत राष्ट्रीय महामार्गावर टोल आकारणी केली जाते. तेथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलचे दर ठरवून दिले आहेत. त्यानुसार तेथील दर हे साधारण १ रुपये ७३ पैसे आहे. उत्तर प्रदेशातील ‘यमुना एक्स्प्रेस’ हा सर्वांत मोठा ‘एक्स्प्रेस-वे’ आहे. या महामार्गावर २ रुपये ६५ पैसे इतका किमी चारचाकी गाड्यांसाठी टोल आकारणी केली जाते. गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर ज्या सोयी- सुविधा दिल्या जातात, त्या तर ‘एक्स्प्रेस-वे’वर मिळत नाहीच; पण टोल मात्र जवळपास दुप्पट द्यावा लागतो.
चक्रवाढ पद्धतीने होतील टोलवाढ
एक्स्प्रेस-वेवर आधीच टोल जास्त आहे. त्यात त्यामध्ये दर ३ वर्षांनी होत असलेली वाढ दरवेळी अधिक होताना दिसते. २०१७ मध्ये चारचाकीच्या १९५ रुपयांच्या टोलमध्ये ३० रुपयांनी वाढ होऊन तो २३० रुपये झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये आणखी ४० रुपयांनी वाढून तो २७० रुपये झाला आणि आता ५० रुपयांनी वाढून ३२० रुपये झाला आहे. याच प्रमाणात अन्य वाहनांमध्ये वाढ होताना दिसते.