नितीश गोवंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील पुणे ते मुंबई ही मार्गिका उद्या (गुरूवार) दोन तास बंद राहणार आहे. या द्रुतगती महामार्गालगत डोंगरावर दगड अडकले आहेत. ते काढण्यासाठी ही मार्गिका दुपारी १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. बोरघाट महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश भोसले यांनी ही माहिती दिली. २३ जुलै रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दगड-मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती.
दरड कोसळल्यानंतर काही दगड अधांतरी अडकले होते. ते दगड पाडण्यासाठी गुरुवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील लेन दोन तास बंद राहणार आहे. या कालावधीत रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावरील अडकलेले दगड काढण्यात येणार आहेत. केवळ कारच्या वाहतुकीसाठी जुना पुणे-मुंबई महामार्ग सुरू राहणार आहे. तसेच या वेळेत हलकी वाहतूक मॅजिक पॉईंट पासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. तर अवजड वाहतूक किवळे पासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरूच राहील, अशी माहिती देखील देण्यात आली.