पुणे : दरड कोसळल्याने मागील १२ दिवसांपासून बंद असलेली पुणे-मुंबईदरम्यानचीरेल्वे वाहतुक शुक्रवार (दि. १६)पासून ‘रुळावर’ आली. दोन्ही शहरांदरम्यान डेक्कन क्वीन, इंद्रायणी, सिंहगड व इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या धावल्या. शनिवार (दि. १७)पासून सर्व गाड्या नियमित वेळेनुसार धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुणे व मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. घाटामध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडत होते. तसेच मुंबई विभागात अनेकदा रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे गाड्या रद्द करण्याबरोबरच अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली. त्यानंतर या मार्गावर रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. दि. ४ ऑगस्टपासून यामार्गे जाणाऱ्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेससह लांबपल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. काही गाड्यांना पुणे, दौंड किंवा सोलापुरमधूनच वळविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.दरडीमुळे रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे संपुर्ण रेल्वे यंत्रणा हा मार्ग दुरूस्त करण्यासाठी युध्दपातळीवर दिवसरात्र कार्यरत होता. हा मार्ग नेमका कधी सुरू होणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडूनही स्पष्टपणे माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे सातत्याने रेल्वे गाड्या रद्द करणे, पुन्हा पुर्ववत करणे, मार्ग बदलले जात होते. अखेर मध्य रेल्वेने शुक्रवारपासून मार्ग सुरू करण्याची घोषणा स्वातंत्र्यदिनी केली. त्यानुसार शुक्रवारी मुंबईतून पुण्याकडे डेक्कन क्वीन रवाना करण्यात आली. तर पुण्यातून इंटरसिटी व इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्या मुंंबईकडे धावल्या. सिंहगड एक्सप्रेसने दोन्ही शहरादरम्यान एक फेरी पुर्ण केली. शनिवारपासून सर्व इंटरसिटी एक्सप्रेसबरोबरच इतर लांबपल्ल्याच्या गाड्याही नियमित वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तत्पुर्वी या गाड्या दि. १९ आॅगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. दोन्ही शहरांदरम्यान रेल्वेसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या काळात रेल्वे प्रवाशांना एसटी बसचा मोठा आधार मिळाला. तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
पुणे-मुंबई रेल्वे बारा दिवसांनी ‘रुळावर’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 12:49 PM
मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यानंतर यामार्गे जाणाऱ्या सर्व इंटरसिटी एक्सप्रेससह लांबपल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या.
ठळक मुद्देदरडीमुळे रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान : रेल्वे यंत्रणा मार्ग दुरूस्त करण्यासाठी दिवसरात्र कार्यरत