पुणे : राज्यात ओमायक्रॉनच्या व्हेरियंटचे रुग्ण वाढत असले तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्या १८ टक्क्यांनी घटली आहे. सर्वाधिक बाधित असलेल्या पुण्यासह मुंबई, ठाणे, नागपूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये कोरोनासंसर्गाचे प्रमाण घटल्याने दिलासा मिळाला आहे.
आरोग्य विभागाने राज्यात ११ ते १७ जुलैदरम्यान आढळलेल्या कोरोनासंसर्गाचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार हाॅटस्पाॅट राहिलेल्या पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमधील संसर्ग घसरत आहे. या आठवड्यात रुग्णसंख्या १८ टक्क्यांनी घटली आहे. याउलट नागपूरमध्ये ५५ टक्क्यांनी, तर नाशिकमध्ये ४४ टक्क्यांनी रुग्ण वाढले आहेत. ठाणे जिल्ह्यात या आठवड्यात कोरोनामुळे सर्वाधिक १२ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यावर आहे. सध्या राज्यात सातारा जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण २.११ टक्के आहे. पुणे, सातारा, मुंबईपाठोपाठ बाधित रुग्णांच्या मृतांमध्ये ठाण्याचा क्रमांक लागतो.
पुणे, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांत सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आहे. येथील रुग्णांचे प्रमाण १४ ते २२ टक्क्यांपर्यंत आहे. त्या तुलनेत राज्याचा पॉझिटिव्ह दर ६.१९ टक्के आहे. अमरावती, नंदुरबार, नांदेड, जळगाव, अकोला येथे चाचण्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या चार आठवड्यांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाल्याचेही आढळले आहे. कोल्हापूर, परभणी, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नवे बाधित रुग्ण आढळण्याच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होण्याचे रुग्णांचे प्रमाण शून्य टक्क्यावर आले आहे. येथे केवळ चाचण्यांवर रुग्णांचे निदान केले जात आहे.