लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीसाठी विद्यापीठातील आरोग्य विज्ञान विभागाचे डॉ. भूषण पटवर्धन, भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख अंजली क्षीरसागर, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. आर. करमळकर, मुंबईच्या रुईया कॉलेजचे प्राचार्य सुहास पेडणेकर, मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. ए. बी. पंडित यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी निमंत्रित केले आहे. त्यामुळे यंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा मान पुण्याला मिळतो की मुंबईला, याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यपाल भवनामध्ये १६ मे रोजी अंतिम यादीत निवडल्या गेलेल्या ५ उमेदवारांच्या मुलाखती सी. विद्यासागर राव घेणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील कुलगुरू शोध समितीने ३१ उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडलेल्या ५ जणांची यादी शुक्रवारी राज्यपालांकडे सुपूर्द केली. त्यानंतर राज्यपाल कार्यालयामधून शुक्रवारी दुपारी अंतिम यादीतील पाचही उमेदवारांना फोन करून मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले.कुलगुरुपदी कोण बसणार, यावरून अनेक तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत होते. विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विदर्भातील व्यक्तीच येणार, अशी चर्चा सुरू होती; मात्र अंतिम यादीमध्ये विदर्भातील उमेदवारांचा समावेश झालेला नाही. पुणे किंवा मुंबईतील उमेदवारांच्या गळ्यातच कुलगुरुपदाची माळ पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शोध समितीमध्ये काकोडकर यांच्यासह जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार आर. यरागट्टी व सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांचा समावेश होता. कुलगुरुपदासाठी एकूण ९० जणांनी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी करून, ३२ जणांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ५ जणांच्या नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
कुलगुरुपदाचा मान पुणे की मुंबईला?
By admin | Published: May 13, 2017 4:57 AM