पुणे : पुणे महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाने हातगाडीवर अतिक्रमण कारवाई करून भाजी विक्रेत्याला १० हजार रुपयांचा दंड केला. भाजी विक्रेत्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड केल्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन अतिक्रमण कारवाई करतानाचा दंड कमी करावा अशी मागणी केली.
धनकवडी येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक परिसरात रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून भाजी विकणाऱ्या भाजी विक्रेत्यावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. अधिकाऱ्यांशी चर्चा करून एवढा दंड घेणे बरोबर नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. मात्र सावंत यांच्या शिष्टाईला न जुमानता अधिकाऱ्याने १० हजारांचा दंड वसूल केला. त्यामुळे सावंत यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. अतिक्रमण कारवाई करतानाचा दंड कमी करावा. पथारी व्यावसायिकांसाठी जागा निश्चित कराव्यात, अशी मागणी केली. पथारी व्यावसायिकांवर अशी कारवाई केली तर ते उद्ध्वस्त होतील. मग ते गुन्हेगारीकडे वळू शकतात असे सावंत यांनी सांगितले. त्यावर अतिक्रमण कारवाईवरील दंडाचा विचार करू, असे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.