पुणे: पुण्यातील सिंहगड रोड भागात एकता नगरी, निंबजनगरी, विठ्ठलवाडी परिसरात खडकवासला धरणातील विसर्गामुळे घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे सामान्यांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. प्रशासनाच्या मदतकार्याने नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला. महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत सिंहगड रस्ता क्षेत्रीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त पुणे महापालिका (सिंहगड रोड क्षत्रिय कार्यालय) संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे.
पुण्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्ता भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा पालकमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. नागरिकांचे हाल होण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा असे आदेश देखील दिले होते. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचे आदेश दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आता महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले आहेत. या पूर परिस्थितीमध्ये कर्तव्यात कसुरी करणाऱ्या अधिकाऱ्याला महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी निलंबित केले.