पुणे : चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणारी १३ हेक्टर जागा मिळवण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. संबधित जागामालकांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्याशिवाय बाधीत कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिका आयुक्त त्यांची शुक्रवारी बैठक घेणार आहेत.उद्घाटनानंतर या पुलाच्या कामाबाबत महापालिकेकडून काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे या कामासाठी पुढाकार घेणाऱ्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना भूसंपादनाच्या तसेच पुनर्वसनाच्या संदर्भात अडचणी सोडवण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार आता महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने खासगी जागेसंदर्भात तेथील जागामालकांशी बोलणी करण्यास सुरूवात केली आहे. भूसंपादन कायद्यानुसार जागा ताब्यात घ्यायची तर त्याला वेळ लागणार असून त्यामुळे याबाबत त्यांच्याशी थेट चर्चा करून तडजोड करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येणार आहे.सुमारे ११२ कुटंबे या पुलाच्या कामाने बाधीत होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेवरच आहे. ते कसे करायचे, संबधित कुटुंबाना काय अपेक्षित आहे यासाठी महापालिका आयुक्त शुक्रवारी या कुटुंबाची बैठक घेणार आहेतउड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर कात्रज देहूरस्ता या मार्गावरील वाहतूक काही महिने पुर्ण बंद ठेवावी लागणार आहे. त्यासाठी पर्यायी रस्ता तयार करावा लागेल. काही ठिकाणी रस्ते बांधावेही लागतील. त्यालाही खासगी जागा काही काळापुरती घ्यावी लागणार आहे. किती जागा लागेल, ती कोणाची आहे याची माहिती महापालिकेकडून घेण्यात येत आहे. त्यानंतर संबधितांना त्याचा किती मोबदला, कशा स्वरूपात द्यायचा याचाही विचार केला जाईल.चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे, मात्र महापालिकेकडून त्यातील अडचणींचा विचारच केला जात नव्हता. आता या कामाबाबत हालचाली सुरू झाल्यामुळे भूसंपादन व पुनर्वसन यातील सर्व अडथळे दूर होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पुलाच्या कामासाठी एकूण १३ हेक्टर जागा लागणार आहे. त्यातील फक्त २ हेक्टर जागा महापालिकेकडे आहे. उर्वरित ११ हेक्टर जागा खासगी जागेचे संपादन करावे लागेल. ते कसे करायचे हा यातील मुख्य प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी महापालिकेने काही पर्याय तयार केले असून त्याबाबत जागा मालकांबरोबर चर्चा करण्यात येईल.- सतीश कुलकर्णी, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, महापालिका