पुणे : मिळकतकर विहित मुदतीत भरणाऱ्या ४ लाख ९३ हजार ७०५ मिळकतधारकांना ५ ते १० टक्के सवलतीचा लाभ मिळाला आहे. त्यांच्याकडून ८३६ कोटी ८ लाख रूपये मिळकत कर जमा करण्यात आला आहे.
कर आकारणी व कर संकलन विभागाचे उप आयुक्त माधव जगताप यांनी याबाबत माहिती दिली. महापालिकेकडून दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे, २०२४ या दोन महिन्यात मिळकतकर भरणाऱ्यांना ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणखी तीन दिवस असून, यासाठी महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालय ५६ संपर्क कार्यालये अशा ७१ ठिकाणी व्यवस्था केली गेली आहे. या सर्व ठिकाणी शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक शासकीय सुट्टीच्या दिवशीही सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांना मिळकत कर भरता येणार आहे.
पुणे शहरात साधारणत: १४ लाख २२ हजार मिळकती आहेत. ज्या मिळकतधारकांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची देयके मिळाली नाहीत, त्यांनी मिळकतकर विभागाच्या propertytax.punecorparation.org या संकेतस्थळावरून देयके प्राप्त करून घ्यावीत असे आवाहन मिळकत कर विभागाने केले आहे.
२८ मे पर्यंत महापालिकेकडे ८३६ कोटी ८ लाख रूपये जमा झाले असून, यापैकी २२६ कोटी ५८ लाख रूपये हे धनादेशाव्दारे प्राप्त झाला आहे. तर ८७ कोटी ९४ लाख रूपये रोख स्वरूपात प्राप्त झाले आहेत. दरम्यान प्राप्त मिळकत करामध्ये ३ लाख ४५ हजार ७७५ मिळकतधारकांनी म्हणजेच ७० टक्के जणांनी ५२१ कोटी ५४ लाख रूपये हे ऑनलाईन प्रणालीव्दारे भरले आहेत.