पुणे: पुणे महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने दिवाळी निमित्ताने ९ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत किल्ले स्पर्धा आयोजित केले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी राजे उद्यानात ही स्पर्धा होणार आहे. किल्ले स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रत्येक विभाग व गटांमध्ये प्रथम क्रमांकाला ५ हजार रुपये , द्वितीय क्रमांक तीन हजार आणि तृतीय क्रमांक २ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ७ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे राहणीमानात झालेल्या बदलांमुळे मुलांना किल्ला करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे किल्ले तयार करण्यासाठी जागा मिळावी आणि विधाथ्याच्या मनात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका दरवर्षी स्पर्धा आयोजित करत असते. या स्पर्धेतील किल्ल्यांचे परीक्षण इतिहास व भूगोल तज्ञ यांच्याकडून करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे.
या स्पर्धेमध्ये सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, सिंहगड , प्रतापगड ,शिवनेरी ,लोहगड, तोरणा ,सिंधुदुर्ग ,मल्हारगड, जंजिरा या किल्लाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. उदघाटनानंतर हे प्रदर्शन नागरिकांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले असणारे अशी माहिती पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.