पुणे : गृहनिर्माण सोसायट्यांकडून इमारत पूर्णत्वाचा दाखला घेताना व्हर्मिकल्चर पीट अथवा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारल्याचे दाखविले जाते. परंतू, नंतर मात्र त्याठिकाणी पार्किंग अथवा तत्सम गोष्टी केल्या जातात. पालिकेने आतापर्यंत तब्बल 893 सोसायट्यांना नोटीसा बजावल्या असून 102 सोसायट्यांकडून चार कोटी 37 हजार 295 रुपयांचा दंड वसूल केला आहे. अद्यापही अनेक सोसायट्यांमधील नागरिकांचा कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध असून प्रत्येक घरटी दंड भरण्याची तयारी सोसायटीने दर्शविल्याचीही उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. आतापर्यंत नोटीसा बजावण्यात आलेल्या सोसायट्यांपैकी 60 टक्क्यांच्या आसपास सोसायट्यांनी प्रकल्प सुरु करण्यास संमती दर्शविल्याचे घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले. प्रतिदिन 100 किलोंपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांमध्ये कचरा जिरवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पालिकेने अशा सोसायट्या आणि आस्थापनांची जंत्रीच तयार केली आहे. जनजागृतीसह नोटीसा देऊन सोसायट्यांना कचरा त्यांच्याच आवारात जिरवण्याबाबत सूचनाही दिलेल्या आहेत. परंतू, अनेक सोसायट्यांनी आमच्याकडे जागाच नाहीत, पैसे नाहीत, डास होतात, उंदीर होतात-घूस लागते, दुर्गंधी येते अशी कारणे देत कचरा प्रकल्प करण्यास विरोध केला आहे. सोसायट्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तसेच कचरा जिरवल्याने कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत हे पटवून देण्यासाठी घनकचरा विभागाने सोसायट्यांसाठी प्रात्यक्षिक आणि कार्यशाळाही आयोजित केलेली होती. परंतू, त्याला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही. ====एका सोसायटीचे काही पदाधिकारी शुक्रवारी घनकचरा विभागामध्ये आले होते. विभागप्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांची त्यांनी भेट दिली. या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पालिका करेल तो दंड आम्ही भरायला तयार आहोत. पण आम्हाला कचरा प्रकल्प नको असे स्पष्ट केले. त्यामुळे सोसायट्यांनी अशी भूमिका घेतली तर कचरा जिरवण्याचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार असा प्रश्न आहे.
पुणे पालिकेने 102 सोसायट्यांकडून वसूल केला सव्वाचार कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 9:06 PM
प्रतिदिन 100 किलोंपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांमध्ये कचरा जिरवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
ठळक मुद्दे प्रत्येक घरटी दंड भरण्याची तयारी सोसायटीने दर्शविल्याचीही उदाहरणे समोर