लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना काळात पालिकेच्या सर्वच विभागांना आर्थिक फटका बसला आहे. मात्र, कर संकलन आणि कर आकारणी विभागाने मात्र पालिकेचा आर्थिक गाडा सावरला आहे. विभागाने आतापर्यंत तब्बल १ हजार ५१५ कोटींचा कर जमा केला असून, गेल्यावर्षीपेक्षा २५३ कोटींनी हे उत्पन्न वाढले आहे. पुणे महापालिका देशात सर्वाधिक मिळकत कर जमा करणारी ठरल्याचा दावा विभागप्रमुख विलास कानडे यांनी केला.
मिळकत कर विभागाच्या प्रयत्नांना पुणेकरांनी उत्तम साथ दिली आहे. पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांसह एकूण मिळकतीची संख्या ११ लाख ३ हजार ८९ झाली आहे. पालिकेकडे ७ लाख ८३ हजार मिळकतधारकांनी १ हजार ५१५ कोटींचा मिळकत कर जमा केला आहे. मिळकत कर न भरणाऱ्या ४९२ मिळकती जप्त करून सील करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ११७ मिळकतधारकांनी १३ कोटी ८८ लाख २८ हजारांचा मिळकत कर भरला आहे. अद्यापही ३७५ मिळकती सील आहेत.
चौकट
आर्थिक वर्षात नव्याने ४६ हजार २७२ इमारतींची मिळकत करासाठी नोंदणी केली आहे. त्यातून ३८९ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे.
चौकट
३१ मार्चअखेरपर्यंत सर्व सुट्ट्यांच्या दिवशी मिळकत कर भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. शहरातील ११ लाख मिळकतधारकांना १ एप्रिलपासून मिळकतकराची बिले पाठविली जाणार आहेत. १५ एप्रिलपर्यंत ही बिले सर्वांना मिळणार आहेत.
चौकट
ऑनलाईन कर भरणा सर्वाधिक
पुणेकरांनी मिळकत कर भरण्यास ऑनलाईन पद्धतीला अधिक महत्व दिले आहे. तब्बल ५ लाख ४५ हजार ५३३ मिळकतधारकांनी ८०० कोटींचा मिळकत कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे.