पुणे : महापालिकेने सांस्कृतिक धाेरण तयार केले असून, ते मान्यतेसाठी स्थायी समितीसमाेर ठेवले आहे. मात्र, हे धोरण तयार करण्यापूर्वी व त्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी चर्चा केली नसल्याने महापालिका आयुक्तांनी उपायुक्तांना झापल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये होती.
पुण्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे. विद्येचे माहेरघर असलेले पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुण्याचा सांस्कृतिक वारसा जतन करणे, त्याचे संवर्धन करणे आणि ताे टिकवणे, यासाठी महापालिकेने सांस्कृतिक धाेरण तयार केले आहे. या धोरणानुसार सांस्कृतिक उपक्रमांत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी टाऊन हाॅल बैठका, सांस्कृतिक मंचाचे आयाेजन केले जाणार आहे. याचबराेबर पुण्यातील स्थानिक कलाकार, सांस्कृतिक केंद्रे, शैक्षणिक संस्था यांचे सहकार्य घेणे, पायाभुत सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक स्थळे, प्रदर्शन स्थळे, कलाप्रदर्शन आणि मैफलींसाठी जागा निर्माण करून व्यासपीठ उपलब्ध करून देणे. तसेच पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक व्यावसायिकांचा आर्थिक विकास घडविणे, आदी गोष्टींचा यात समावेश असेल.
हे धाेरण तयार करताना पुणे शहरातील सांस्कृतिक विविधा, सामाजिक ऐक्य, आर्थिक विकास, याचा विचार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी प्रायाेजक, भागिदारीची संधी देण्यात येणार आहे. हे धोरण तयार करून ते मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, धोरण तयार करण्यापूर्वी चर्चा करण्यात आली नाही, थेट धोरण ठेवल्याने महापालिका आयुक्तांनी सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्तांना चांगलेच झापल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये होती.