शंभर किलोपेक्षा अधिक कचरा तयार होणाऱ्या सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. त्यावर योग्य ती प्रक्रिया करून जिरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होंणार असल्याचे महापालिकेने काढलेल्या नोटिसमधून नमूद करण्यात आले आहे.
शहरात दिवसेंदिवस कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पालिकेचे प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने जवळपास तीनशे ते चारशे टन कचरा डंपिंग करावा लागत आहे. आता शासनाने दिलेल्या आदेशानुसार ज्या सोसायट्यांमध्ये शंभर किलोपेक्षा जास्त कचरा तयार होत आहे. अशा ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शहरात सर्वत्र कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. वस्त्यांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणावर साठत आहे. पण त्यांना जागेअभावी कचरा जिरवण्यासाठी प्रकल्प उभारता येत नाही. परंतु मोठ्या सोसायट्यांमध्ये जागाही उपलब्ध असल्याने ते असे प्रकल्प उभारू शकतात. काहींनी दाखवण्यापुरते कचरा विघटनाचे प्रकल्प उभारले आहेत. अशा सोसायट्यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कचरा प्रक्रिया केली जात नसल्यास ५ ते १५ हजार पर्यंतचा दंड आकाराला जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.