पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरिता निश्चित करण्यात आलेल्या ५८ प्रभागांमध्ये, कुठे महिला आरक्षण असणार याची सोडत ३१ मे रोजी गणेश कला, क्रीडा मंच येथे सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. सदर सोडतीची रंगीत तालीम ३० मे रोजी होईल.
५८ प्रभागांमध्ये १७३ सदस्यांपैकी ८७ जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. यामध्ये १२ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार आहे. तर ७४ ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण राहणार आहे. या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग असल्याने २९ प्रभागांमध्ये दोन जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत.
३१ मे रोजी होणाऱ्या सोडतीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी गणेश कला येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.
महापालिकेच्या ५८ प्रभागात १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार असून, यात २३ जागा अनुसूचित जाती तर २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी जास्त जागा उपलब्ध झालेल्या आहेत. गणेश कला, क्रीडा मंच येथे होणाऱ्या आरक्षण चिठ्ठ्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. तसेच स्टेजवर होणाऱ्या या सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्याची प्रक्रिया एलएडी स्क्रीनवर लाईव्ह दाखविण्यात येणार आहे.