पुणे : कोरोनामुळे लॉडडाऊन लागू करण्यात आल्यानंतरही महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी जिवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. काही कर्मचारी तर शक्य होईल तशी समाजसेवाही करीत आहेत. अशाच एका कर्मचाऱ्याने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी या कर्मचा-याने डायस प्लॉट, गुलटेकडी परिसरातील वीस निराधार-विधवा महिलांची वटपौर्णिमा गोड केली.सचिन अशोक कोथमिरे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोथमिरे हे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करतात. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने कष्टकऱ्यांचे जगणेही जिकीरीचे झाले आहे. रोजगार नसल्याने अनेकांना घरातील दैनंदिन खर्च भागवणेही अवघड झाले आहे. त्यातच विधवा, निराधार महिलांना तर असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.या महिलांच्या मदतीला धावून जात कोथमिरे यांनी आपल्या मासिक वेतनामधून वीस महिलांना आर्थिक मदत केली. डायस प्लॉट, गुलटेकडी येथील महिलांना घरी जाऊन वटपौर्णिमेचे औचित्य साधत प्रत्येकी ५०० रुपयांची आर्थिक मदत केली. याबद्दल कोथमिरे म्हणाले, माझे वेतन कमी असले तरी काही गरजा मर्यादित ठेवत मी मदत करण्याचा निर्णय घेतला. या महिलांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शक्य होईल तसे मी आणखी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहेपालिकेच्या ७५ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांभोवती कोरोनाचा धोका घोंगावत असतानाही हे कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांनी या संकट काळातही आपली सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक भान याची जाणीव ठेवली आहे. कोथमिरे यांनी केलेल्या मदतीमुळे या महिला भावनिक झाल्या होत्या. त्यांनी कोथमिरे यांचे आभार मानले.
पुणे महापालिका कर्मचाऱ्याने सामाजिक बांधिलकी जपत केली 'त्यांची' वटपौर्णिमा गोड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 4:58 PM
माझे वेतन कमी असले तरी काही गरजा मर्यादित ठेवत मी मदत करण्याचा निर्णय घेतला.
ठळक मुद्देआपल्या मासिक वेतनामधून वीस महिलांना आर्थिक मदत केली.