पुणे : पुणे महापालिकेच्या तीन हजार कोटी रूपयांच्या ठेवी विविध बॅकामध्ये असताना २३ समाविष्ट गावातील सांडपाण्यासाठी ५३० कोटी रूपयांचे कर्ज कशासाठी काढायचे असा सवाल स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला आहे. बॅकांचे वाढते व्याजदर लक्षात घेता साडेनउ ते दहा टक्के दराने घ्यावे लागेल पण पालिकेच्या ठेवी ७.९२ टक्के दराने बॅंकांमध्ये पडून आहेत. कर्ज काढायची एवढीच हौस असेल तर ठेवींच्या आधारे कमी व्याजदरात त्याच बॅंकाच कर्ज देतात. या पर्यायाचा विचार करावा अशी मागणीही सजग नागरिक मंचाने केली आहे.
पुणे महापालिकेच्या महापालिकेच्या २ हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी ४ बॅंकांमध्ये आहेत तर ७५५ कोटी रुपये गव्हेमेंट सिक्युरीट मध्ये गुंतवलेले आहेत. तरीही २३ समाविष्ट गावांतील सांडपाणी व्यवस्थापनासाठी ५३० कोटी रुपयांचे कर्ज भरमसाठ व्याजदराने काढण्याचे डोहाळे कशासाठी लागले आहेत. हे अनाकलनीय आहे. बॅकांचे वाढते व्याजदर लक्षात घेता साडेनउ ते दहा टक्के दराने घ्यावे लागेल. पण पालिकेच्या ठेवी ७.९२ टक्के दराने बॅंकांमध्ये पडून आहेत. याकडे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी लक्ष वेधले.