पुणे :पुणे महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक वाडे उतरवले जातात. त्यानुसार शहरातील धोकादायक असलेल्या ४६ वाड्यांना पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटीस बजावली आहे.
शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये जुने वाडे आणि धोकादायक इमारती आहेत. पालिकेकडून दरवर्षी अशा वाड्यांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार अतिधोकादायक वाडे, मध्यम धोकादायक वाडे, कमी धोकादायक वाडे असे वर्गीकरण केले जाते. संबंधित वाडे मालकांना त्याबाबतच्या सूचना केल्या जातात. धोकादायक वाडे उतरवण्यास सांगितले जाते. त्याचा खर्चही संबंधित वाडेमालकाकडून वसूल केला जातो. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात जागा मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद असल्याने अशा वाड्याची दुरूस्ती जागा मालक करत नाहीत. त्यामुळे हे वाडे पावसाळ्यात कोसळण्याचा धोका असतो.
पुणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात १४१ धोकादायक वाडे आढळले. त्यापैकी ९५ धोकादायक वाडे गेल्यावर्षी उतरविण्यात आले. तर ४६ वाडे उतरविण्यास नागरिकांकडून विरोध हाेत आहे. या वाड्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, ते धोकादायक असल्याचे फलकही लावण्यात आले आहेत.