पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर, महापालिकेच्या निवडणूक विभागाने आता प्रत्येक प्रभागाकरिता स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला आहे. या सर्वांना संबंधित प्रभागात एक निवडणूक कचेरी सुरू करण्यासाठी जागा शोधण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार काम करतानाच, पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपली पूर्वतयारी पुणे महापालिकेच्या वतीने सुरू केली आहे. त्यानुसार आज १५ क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या व नव्याने रचण्यात आलेल्या प्रभागांसाठी स्वतंत्र कार्यालय तयार करून एक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.
येणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख मे अखेर असली तरी, महापालिकेने आतापासूनच मतदार याद्या प्रभागनिहाय करण्याचे कामही सुरू झाले आहे. यामुळे अंतिम मतदार यादीतील नवीन मतदार हे पुरवणी यादीत जाणार आहेत.
निवडणूक आयोगाचे आदेश अथवा निवडणुकीचा संभाव्य बदल हे काय असतील, हे आता कुणीच सांगू शकत नाही. राज्यात पुढील चार महिने हे पावसाळ्याचे असल्याने निवडणूक सप्टेंबरनंतर होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाबाबत येत्या १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत १२ जुलैपर्यंत सक्षम बाजू व आवश्यक डेटा सादर केला तर, राज्यातही ओबीसी आरक्षणासह निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.