पुणे : महापालिकेतर्फे मागील १० दिवसांमध्ये ४ जाहिरात फलक, ३७४८ बोर्ड, ३५२० बॅनर, १५७७ फ्लेक्स, १०६९ झेंडे, ४६४८ पोस्टर, १५०६ किआॅक्स, १९५३ इतर असे एकूण १८ हजार २३ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अद्यापपर्यंत जाहिरात फलक निष्कासन कारवाईतून दीड लाख रुपयांचा दंड वसूल भरण्यात आला आहे. तसेच, बोर्ड, बॅनर, पोस्टर इत्यादी अनधिकृतपणे लावलेल्या संबंधितांकडून ७ लाख १२ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.
अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई केल्यानंतर ५० हजार रुपयांचा दंड जाहिरात फलकधारकाकडून वसूल करण्यात येतो. संबंधिताने मुदतीत दंड न भरल्यास संबंधित जागामालकाच्या मिळकतीवर दंडाच्या रकमेचा बोजा चढवण्यात आला आहे. त्यानुसार, संबंधित २९ जागा मालकांच्या मिळकतीवर १४ लाख ५० हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे. कारवाई नियमितपणे सुरु ठेवण्यात येणार असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अतिरिक्त सेवक पुरवण्यात आले आहेत.
निनावी जाहिरात फलकधारकांच्या होर्डिंगवर कारवाई केल्यानंतर जाहिरात फलकाचे संपूर्ण साहित्य जप्त करण्यात येते. अद्यापपर्यंत १४५० किलो लोखंड जप्त करण्यात आले आहे. आजपर्यंत अनधिकृत होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, झेंडे लावणा-या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ५३ ठिकाणी पोलीस स्टेशनना फिर्याद देण्यात आली आहे. फिर्याद दिल्यानंतर ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विनापरवाना जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, झेंडे, साईड आणि फ्रंट मार्जिनमध्ये नामफलक, साइनेजेस उभारु नयेत आणि शहर विदु्रपीकरण थांबवावे, असे आवाहन परवाना आणि आकाशचिन्ह विभागाकडून करण्यात आले आहे. विद्रुपीकरण करणा-या संबंधितांवर दंडात्मक आणि फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. नामफलकधारकांनी त्यांच्या फलकांचे नियमितीकरण करण्यासाठी कागदपत्रांसह आपले प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.