पुणे : कोरोनासोबत मुकाबला करीत दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आता आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दोन्हीही आरोग्य प्रमुख तब्येत बरी नसल्याने रजेवर गेले आहेत. ऐन कोरोना काळात हा विभागच जायबंदी होत असल्याचे दिसत आहे.राज्य शासनाने महापालिकेच्या मदतीकरिता आरोग्य प्रमुख म्हणून पाठविलेल्या डॉ. नितीन बिलोलीकर हे मागील 15 दिवसांपेक्षा अधिक काळापासून रजेवर गेलेले आहेत. पालिकेत हजर झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस काम केलेल्या बिलोलीकर यांनी काही बैठकांनाही हजेरी लावली होती. परंतू, त्यांचे वय 60 पेक्षा अधिक असल्याने त्यांना कामाचा ताण जाणवू लागला होता. काही दिवसांनी त्यांची तब्येत बिघडली. उपचारांसाठी ते रजेवर गेले.दरम्यान, दोन वर्षांपासून पालिकेचे आरोग्य प्रमुख असलेले डॉ. रामचंद्र हंकारे हे सुद्धा कामाच्या ताणामुळे अधूनमधून आजारी पडत होते. गेल्या आठवड्यापासून त्यांना बरे वाटत नव्हते. त्याही स्थितीत ते कामावर येत होते. परंतू, दोन दिवसात त्यांना खुपच जास्त अशक्तपणा आला. तब्येत आणखी बिघडू नये याकरिता त्यांनी रजा टाकली असून पुढील आठवडाभर ते रजेवर आहेत.दोन्हीही आरोग्य प्रमुख रजेवर आहेत. त्यामुळे आरोग्य प्रमुख पदाचा तात्पुरता पदभार सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आरोग्य प्रमुख रजेवर असले तरी सर्व कामे व्यवस्थित आणि नेहमीप्रमाणे सुरु असल्याचे साबणे यांनी सांगितले.
दुष्काळात तेरावा महिना! ऐन कोरोनाच्या काळात पुणे पालिकेचे दोन्हीही आरोग्यप्रमुख रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 7:49 PM
पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग 'ऑक्सिजन'वर
ठळक मुद्देमहापालिकेच्या आरोग्य विभागाचे दोन्हीही आरोग्य प्रमुख तब्येत बरी नसल्याने गेले आहेत रजेवर