पुणे : शहरातील मध्यवर्ती भागात जोगेश्वरीच्या बोळातील सानेवाड्यात एकटी राहणारी ८३ वर्षीय आजी न्याय मिळण्याच्या अपेक्षेने आपली तक्रार महापालिकेकडे मांडली; पण असंवेदनशील प्रशासनाने सुरुवातीला ती तक्रार या विभागातून त्या विभागात पाठवित राहिले. शेवटी प्रत्यक्ष पाहणी न करता सदर बाब खासगी आहे, असे सांगून प्रश्न निकालात काढला. यावरून महापालिकेच्या या टाेलवाटाेलवीत ८३ वर्षांची आजी लढणार कशी?, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
न्यायासाठी सनदशीर मार्गाने लढणाऱ्या या वयोवृद्ध विदुषी म्हणजे वनस्पतीशास्त्राच्या प्रख्यात अभ्यासक डॉ. हेमा साने. त्या ८३ वर्षांच्या आहेत. नैसर्गिक जीवनशैली अंगीकारत १२१ बुधवार पेठ येथील जोगेश्वरीच्या बोळातील सानेवाड्यात त्या एकट्याच राहतात. सानेवाड्याच्या तीन-चार घरे पुढे असलेल्या एका सोसायटीने पूर्वपरवानगी न घेताच डाॅ. साने यांच्या खासगी मालमत्तेच्या हद्दीतून ड्रेनेजलाइन नेली. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावरच डाॅ. साने यांना ही बाब समजली आणि त्यांनी संबंधित सोसायटीशी संपर्क साधला. त्यांच्याकडे तक्रारही केली; पण त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. अखेर त्यांनी महापालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात लेखी तक्रार केली. तिथूनही काहीच दखल घेतली गेली नाही, म्हणून त्यांनी महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्रात ऑनलाइन तक्रार केली हाेती.
तक्रारीचा झाला फुटबाॅल :
एका सोसायटीने पूर्वपरवानगी न घेताच डाॅ. साने यांच्या खासगी मालमत्तेच्या हद्दीतून ड्रेनेजलाइन नेल्याची तक्रार डॉ. हेमा साने यांनी ऑनलाइन केली. त्याचे पुढे काय झाले? याबाबत सतत स्टेट्स पाहत हाेते. यात आलेला अनुभव थक्क करणारा आहे. प्रथम ही तक्रार विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवली असल्याचे कळविण्यात आले. नंतर ती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात पाठविली गेली. आधी ती बिल्डिंग परमिशन विभागाच्या कक्षेत होती, नंतर ड्रेनेज संदर्भात दाखवली गेली. यावर कळस म्हणजे आता ही तक्रार सोसायटीमधील अंतर्गत बाब म्हणून फेटाळण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. एकही अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष कामाची पाहणी न करताच तक्रार थेट फेटाळून लावली. हा प्रकार अयोग्य आहे, महापालिका आयुक्त तरी याची दखल घेतील का? असा प्रश्न त्यांनी केला.
वृक्ष प्राधिकरणाची अजब नाेटीस :
जोगेश्वरीच्या बोळातच एक जुना कदंब वृक्ष आहे. त्याचे खोड खराब झाले आहे. सीमा भिंत पाडून पुढे आले आहे. ते धोकादायक झाले आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी वृक्ष प्राधिकरणाकडे केली हाेती. त्यांनी या वृक्षावर नोटीस लावली आहे. त्यात हा वृक्ष पाडल्यानंतर किमान ८ ते १० फूट उंचीची मोठ्या वृक्षांची १० रोपे तिथे लावावीत, असे नमूद केले आहे. डॉ. साने यांनी ही नोटीस वाचली. भरमध्यवस्तीत काँक्रिटच्या जंगलात अशी मोठी रोपे लावावीत कुठे? हे वृक्ष प्राधिकरणानेच इथे येऊन सांगावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.