पुणे: पुणे शहरात नागरिकांची वर्दळ असणाऱ्या मध्यवर्ती भागात ठिकठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवली आहे. लक्ष्मी रस्ता, दगडूशेठ परिसर, अप्पा बळवंत चौक, या भागात मोठया बाजारपेठ आहेत. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी येथे येतात. सर्वच ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने महापाकिकेवर टीकाही होऊ लागली आहे. त्यांनी खोदाईच्या नियमाना धाब्यावर ठेवून हे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते खड्डयात जाण्याची भीती सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे. शास्त्रीय पद्धतीने रस्त्यांची कामे करण्यासाठी तयार केलेल्या नियमावलीचा महापालिकेला विसर पडला आहे. चुकीच्या पद्धतीने खोदाई केल्यानंतर रस्ते घाईघाईने दुरुस्त करण्यासाठी अशास्त्रीय पद्धतीचा वापर महापालिकेच्या पथ विभागाकडून केला जात आहे. पावसाळ्यात या रस्त्यांची दुरवस्था होणार असून लाखो रुपयांची उधळपट्टी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
रस्त्यांची कामे शास्त्रीय पद्धतीने व्हावीत. यासाठी चार वर्षांपूर्वी निवृत्त बांधकाम सचिवांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने भरपूर वेळ घालवून नियमावली तयार केली होती. त्याचा विसर महापालिकेला पडल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्ष्मी रस्त्याची खोदाई केल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र पावसाने दुरुस्त केलेल्या रस्त्यावरच खड्डे पडल्याचे पुढे आले आहे. काही भाग सिमेंटने दुरुस्त करण्यात आला आहे. तोही योग्य प्रकारे न झाल्याने रस्त्यांवर पाणी साचल्याचे समोर आले आहे. रस्त्याची कामे काळजी घेऊनच करावीत असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने महापालिका करत असलेल्या कामामुळे पुणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय ठरणार आहे.
नियमावली काय सांगते?
रस्ता खोदताना तिथे कामाची मुदत, स्वरूप, कंत्राटदाराचे नाव या सारख्या माहितीचा फलक लावण्याचा नियम आहे. संपूर्ण रस्त्याची सरसकट खोदाई न करता थोडा भाग खोदावा, तेथील काम पूर्ण करून रस्त्याची शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती करावी. मग पुढील भागाचे काम सुरू करावे. रस्ते दुरुस्तीनंतर त्या ठिकाणी पाणी साचणार नाही. याची काळजी घेऊन कामे करावीत. अशी नियमावली या समितीने तयार केली आहे.