पुणे : शहरात १५ वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. ही वाहने स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने हे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. त्याने वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. त्यासाठी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वर्षभरात रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने जप्त केली आहे. त्यापैकी ५०६ वाहनांचा लिलाव केला जाणार असुन त्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. शहरातील बेवारस वाहनाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अशी वाहने हालवण्यासाठी आरटीओच्या मदतीने वहान मालकांना नोटीस बजावली जाते. नोटीस बजावल्यानंतरही वाहने न हालवल्यास वाहतुक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात अतिक्रमण विभागाने विविध प्रकारची ५३५ वाहने जप्त केली आहे. यामध्ये ३४५ दुचाकी,९२तीन चाकी, ९१चार चाकी आणि ६ चाकी वाहने जप्त केली आहे. यापैकी ५ दुचाकी, ७ तीन चाकी, १६ चार चाकी आणि १ सहा चाकी वाहन मुळ मालकांनी परत नेली आहेत. सध्या महापालिकेकडे ५०६ वाहने शिल्लक असुन, त्या वाहनांचा लिलाव लवकरच केला जाणार आहे. महापालिकेकडून यापुर्वी जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाची प्रक्रीया दोन वेळा राबविली आहे. २०१८ मध्ये १६ लाख रुपये लिलावातून मिळाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये १ हजार १४६ लिलाव केला गेला आहे. त्यातुन पालिकेला १ कोटी २३ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
पुणे महापालिकेेने रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने केली जप्त; लिलावाच्या प्रक्रियेला सुरवात
By राजू हिंगे | Published: January 03, 2024 2:52 PM