पुणे महापालिकेकडून पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; मालमत्ता करवाढ फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 12:41 PM2020-02-12T12:41:02+5:302020-02-12T12:45:29+5:30

महापालिका आयुक्तांनी केले सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर

Pune Municipal Corporation increased water tax by 15 percent | पुणे महापालिकेकडून पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; मालमत्ता करवाढ फेटाळली

पुणे महापालिकेकडून पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; मालमत्ता करवाढ फेटाळली

Next
ठळक मुद्देशिवसेना व काँग्रेसकडून पाणीपट्टीतील १५ टक्के दरवाढीस विरोध करवसुलीसाठी अभय योजना पुन्हा राबवावी, उत्पन्नाचे अन्य स्रोत बळकट करावेत, आदी सूचना

पुणे : महापालिका आयुक्तांनी सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक सादर करताना मिळकत करातील पाणीपट्टीमध्ये सुचविलेली १५ टक्के दरवाढ पालिकेच्या करविषयक आयोजित खास सभेमध्ये मंजूर करण्यात आली. मात्र ही दरवाढ करतानाच मालमत्ता करात सुचविण्यात आलेली १२ टक्के दरवाढ फेटाळण्यात आली. 
शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी या वेळी पाणीपट्टीतील १५ टक्के दरवाढीस विरोध करीत, प्रथम पुणेकरांना मुबलक पाणी द्या व नंतरच करवाढ करा अशी भूमिका मांडली. २४ बाय ७ ही योजना आणताना १६ फेब्रुवारी २०१६ रोजी पाणीपट्टीतील दरवर्षीच्या १५ टक्के दरवाढीच्या ठरावाचा फेरविचार करावा अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. 
राष्ट्रवादीच्या युवराज बेलदरे, भैय्यासाहेब जाधव, गफूर पठाण यांनी सदर पाणीपट्टी दरवाढीस उपसूचना देऊन, ज्या भागात तीन-चार दिवसांनी पाणी येते. तेथे ही दरवाढ लागू करू नये़, तसेच नवीन समाविष्ट गावांमध्ये ही दरवाढ २४ बाय ७ योजना सुरू होईपर्यंत लागू करण्यात येऊ अशी भूमिका मांडली. मात्र चर्चेअंती ही उपसूचना मागे घेण्यात आली. परिणामी करवाढीत सुचविलेली १२ टक्के दरवाढ फेटाळण्याचा व मिळकत करातील पाणीपट्टीतील १५ टक्के दरवाढ करण्याच्या स्थायी समितीच्या निर्णयास या खास सभेत मान्यता देण्यात आली. दरम्यान, करमणूक करात कुठलीही करवाढ न करता सन २०१९-२० मधील प्रचलित दरच सन २०२०-२१ मध्ये कायम ठेवण्याच्या निर्णयासही यावेळी संमती देण्यात आली. 
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत करवाढीवरील चर्चेत पाणीपट्टी दरवाढ लागू करताना सर्वत्र समान पाणी पुरवठा करावा या मागणीसह, मालमत्ता कर वाढ न करता थकीत कर प्रथम वसूल करावा, करवसुलीसाठी अभय योजना पुन्हा राबवावी, उत्पन्नाचे अन्य स्रोत बळकट करावेत, आदी सूचना उपस्थित सदस्यांनी केल्या. 
...............
मुबलक पाणी दिल्यानंतरच दरवाढ करा 
 पालिकेकडून सुरू असलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना दोन वर्षांत २० टक्केही पूर्ण झालेली नाही़ असे असताना पाणीपटकटीत या योजनेकरिता दरवर्षी १५ टक्के दरवाढ हा पुणेकर नागरिकांचा विश्वासघात करण्याचा प्रकार असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला. प्रथम मुबलक पाणी द्या नंतरच दरवाढ लागू करा अशी मागणी त्यांनी केली.
आजच्या सभेत पाणीपट्टीतील १५ टक्के दरवाढ मान्य केली असली तरी, या दरवाढीस अनेकांनी आक्षेप घेतला. दोन हजार कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या पूर्ततेसाठी ही करवाढ केली. परंतु गेल्या दोन वर्षात या योजनेतील कामांवर दोनशे कोटीही खर्च झाले नाहीत. त्यामुळे ही करवाढ योजना पूर्ण झाल्यावर असावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.
 वसंत मोरे यांनी, पुणे शहरात जेवढे पाणी मीटर बसविले आहेत. यापैकी ५० टक्के मीटर हे एकट्या कात्रज परिसरात बसविण्यात आल्याचे सांगून, आजही येथे वेळेत पाणी मिळत नसल्याने पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ येत आहे. हा भाग चढावरील असल्याने क्लोजर आल्यावर चारचार दिवस पाणी येत नसल्याचे सांगून, ही पाणीपट्टी दरवाढ अन्यायकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. सदस्यांच्या या मतांनंतर बोलताना सभागृह नेते धीरज घाटे यांनी, २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेचे समाधानकारक काम सुरू असून आजपर्यंत ७३ टाक्यांचे काम झाल्याचे सांगितले. यामुळे पाणीपट्टीतील दरवाढ कायम ठेवण्यात आली आहे. मात्र मिळकत करात दरवाढ न करता थकीत कर वसूल करावा़, अशी सूचना केली. 
.......
दिल्लीतील आप सरकारने कुठलीही कर वाढ न करता केवळ आहे. त्या करवसुलीत सुसूत्रता आणून वसुली दुपटीवर नेली. यातून पुणे महापालिकेने काही तरी शिकावे व त्याचे अनुकरण करावे, असा सल्ला माजी उपमहापौर डॉ़ सिद्धार्थ धेंडे यांनी करविषयक खास सभेत सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला दिला.

Web Title: Pune Municipal Corporation increased water tax by 15 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.