पुणे: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. दररोज एक लाखांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात नोंदले जात असून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपुरात कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. तर पुण्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी साधे बेड, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड मिळणंही कठिण झाले आहे. अशा परिस्थितीत पुणे महापालिकेने लष्कराकडे धाव घेऊन ४५० बेडची मागणी केली आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यात जवळपास २१ हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण यातील बहुतांशी बेडला व्हेंटिलेटरची सुविधा नाही. पुण्यात ४८९ बेडला व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. सोमवारी सायंकाळची स्थिती पाहता यापैकी एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी रात्री उशिरानंतर काही बेड उपलब्ध झाले. पण पुण्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसत आहे.
पुण्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता जाणवत आहे. त्यामुळे कोरोना स्थिती अवाक्याबाहेर जात असल्याचं पाहून पुणे महानगरपालिकेनं भारतीय लष्कराकडे मदत मागितली आहे. पुण्यात भारतीय लष्कराचं एक मोठं रुग्णालय आहे. या लष्करी रुग्णालयात ३३५ बेड आणि १५ व्हेंटीलेटरची अद्ययावत सुविधा आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं लष्कराकडे मदत मागितली आहे. लष्करी रुग्णालयाकडून मदत मिळण्याची आशा पुणे महानगरपालिकेनं व्यक्त केली आहे. परंतु या मागणीबाबत अद्याप लष्करी रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, लष्कराचे एक ४५० बेडचे हॅास्पिटल बांधून तयार आहे. ते द्यावे यासाठी मदत मागितली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्फत चर्चा झाली असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांमार्फत आम्ही पाठपुरावा करत आहोत.