पुणे : पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरातील जुन्या जीर्ण झालेल्या धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करून, ते खाली करण्याबाबत हालचाली सुरू केल्या जातात; परंतु अनेकदा या वाड्यांत वर्षोनुवर्षे राहणारे घरमालक व भाडेकरू वाडे साेडण्यास तयार होत नाहीत. परिणामी महापालिकेने अशांना भाडे प्रमाणपत्र देऊन भविष्यात नवीन बांधकामात ३०० चौरस फुटापर्यंत घर देण्याचे आश्वासन देऊ केले आहे. याचा परिणाम महापालिकेचा बांधकाम विभाग १० जूनपर्यंत ३० धोकेदायक वाडे जमीनदोस्त करू शकला आहे.
बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुने व धोकेदायक असे ५८ वाडे तसेच इमारतींना जागा खाली करण्याबाबत तसेच दुरुस्ती करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. या वाड्यांपैकी ३० वाडे जमीनदोस्त करण्यात आले असून, ११ वाड्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तर उर्वरित वाड्यांचा धाेकादायक भाग काढून टाकण्यात आला आहे. हा धोकादायक भाग तब्बल १९ हजार ९९० चौरस फूट इतका आहे.
पालखी सोहळ्यामुळे तीन दिवस थांबविले काम
शहरात मान्सून ठेपला तरी शहरातील जुन्या वाड्यांच्या सर्व्हेचे काम महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमकडून, बांधकाम विभागाकडून तसेच खासगी संस्थेच्या तीन जणांच्या समितीकडून सुरू असून, यामध्ये आणखी ४४ वाडे धाेकेदायक असल्याचे आढळून आले आहे. सध्या पालखी सोहळा पुण्यात असल्याने तीन दिवस वाड्यांवरील कार्यवाही थांबविण्यात आली असून, पालखी सोहळा पुण्याबाहेर पडल्यानंतर ही कार्यवाही पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अभियंते प्रवीण शेंडे यांनी दिली.
शहरातील विभागनिहाय धोकादायक वाडे
रास्ता पेठ : १४मंगळवार पेठ : ५सोमवार पेठ : ११बुधवार पेठ : ३शुक्रवार पेठ : १७गुरुवार पेठ : १कसबा पेठ ८