पुणे महापालिका : पंचवार्षिक कालावधी उरला फक्त ४८ तास; उद्घाटनांची लगीनघाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 02:05 PM2022-03-12T14:05:38+5:302022-03-12T14:22:35+5:30
उद्घाटन, भूमिपूजन नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमांची शहरात लगीनघाई...
पुणे : महापालिकेच्या सभागृहाची पंचवार्षिक कालावधी येत्या १४ मार्च रोजी संपत असल्याने हातात असलेल्या दोन दिवसांमध्ये आप आपल्या प्रभागांमधील उद्घाटन, भूमिपूजन नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमांची शहरात लगीनघाई सुरू आहे.
महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडून शनिवार (दि. ११) व रविवारी होणाऱ्या ३० कार्यक्रमांची पत्रिका छापणे व ती सर्व मान्यवरांपर्यंत पोहोचविण्याकरिता शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या वास्तूंचे उद्घाटन सोहळे घेता येत असल्याने गुरुवारी (दि.१०) झालेल्या सर्वसाधारण सभेत हे सर्व विषय मंजूर करण्यात आले. यामध्ये स्थानिक नेत्यांच्या व समाजातील अन्य मान्यवरांच्या हस्ते विविध प्रभागांमधील होणारे सोहळे वेगळे असले तरी महापालिकेच्या माध्यमातून ३० कार्यक्रम होत आहेत.
यातील १० कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार असून ४ कार्यक्रमांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), दोन कार्यक्रमांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्याहस्ते ९ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे.
महापालिकेचा कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपूल हा यातील महत्त्वाचा कार्यक्रम ठरणार आहे. रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. इतर कार्यक्रमांमध्ये मैदान, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, लोकार्पण सोहळे होणार आहेत शनिवारी महापालिकेचे यात तीन कार्यक्रम असून उर्वरित २७ कार्यक्रम रविवारी होतील.
महापालिकेची औपचारिक किंबहुना गेल्या पाच वर्षातील कामकाजावरील आपले अनुभव व्यक्त करणारी सर्वसाधारण सभा सोमवार १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता विद्यमान महापालिका सभागृहाची मुदत संपुष्टात येत असल्याने रविवारपर्यंतच / सर्व मान्यवरांकडून विविध कार्यक्रम करून घेतले जात आहेत. बुधवारी सकाळपासून महापालिकेचा कारभार इतिहासात दुसऱ्यांदा तेही तब्बल सन १९५८ नंतर प्रशासनाच्या ताब्यात जाणार आहे.