पुणे : एकीकडे राज्यात भाजप शिवसेना युती तुटलेली असताना पुणे महापालिकेतही भाजप आणि आरपीआय यांच्यात नाराजीनाट्य बघायला मिळाले. गेल्या अडीच वर्षांपासून आरपीआयकडे असलेले उपमहापौर पद काढून घेतल्याने आरपीआय नगरसेवकांनी थेट भाजपच्या दालनातून काढता पाय घेतला.त्यांना समजवण्यासाठी भाजप शहाराध्यक्षा माधुरी मिसाळ आणि खासदार संजय काकडे यांनीही प्रयत्न केले. अखेर नाईलाज झाल्यावर त्यांनी भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रामदास आठवले यांना फोन केला आणि हा तिढा सुटला. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे महापालिकेत महापौरपदासाठी आज भाजप आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी भाजपतर्फे महापौर पदासाठी मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज दाखल केला. परंतू याआधी आरपीआयकडे असलेले उपमहापौरपद भाजपने ताब्यात घेतल्याने आरपीआय नगरसेवक नाराज झाले. इतकेच नाही तर त्यांनी भाजपच्या दालनातून बाहेर पडून विरोध व्यक्त केला. त्यात डॉ सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर आदींचा समावेश होता . त्यांची भाजप पदाधिकारी समजूत काढत होते मात्र विषय वाढण्यास सुरुवात झाली. अखेर भाजपने कोणताही धोका न पत्करता थेट प्रदेशाध्यक्ष पाटील यांना फोन केला. त्यांनी आठवले यांच्याशीच बातचीत केली आणि विषयावर पडदा टाकला.
२०१७ साली झालेल्या निवडणुकीनंतर भाजप -आरपीआय युतीला निर्विवाद बहुमत मिळाले. त्यावेळी आरपीआयच्या नवनाथ कांबळे यांना उपमहापौरपद देण्यात आले. त्यांच्या निधनानंतर डॉ सिद्धार्थ धेंडे यांना उपमहापौरपदी काम करण्याची संधी मिळाली. आता महापौर आणि उपमहापौरपदांचे अर्ज दाखल करताना आरपीआयला त्यांचे पद कायम राहण्याची आशा होती. मात्र तसे झाले नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मानसी देशपांडे यांचे नाव उपमहापौरपदाकरिता निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी आरपीआयची भूमिका बदलल्याने त्यांच्या जागी शेंडगे यांना संधी देण्यात आली.