पुणे : महापालिकेच्या कार्यालयात जाऊन उपायुक्त माधव जगताप यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धमकाविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माहिती अधिकार सेलच्या कार्यकर्त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिनेश खराडे (वय ४५) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील पहिल्या मजल्यावरील जगताप यांच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडला.
याबाबत महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप (वय ५१, रा. सदाशिव पेठ) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खराडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती अधिकार सेलचे काम करतात. माधव जगताप हे कार्यालयात काम करत असताना दिनेश खराडे हे मोहमदजी हुसेन लांडगे या दिव्यांग व्यक्तीला घेऊन आले. लांडगे यांच्या प्रश्नांबाबत दिनेश खराडे यांनी मी या व्यक्तीला घेऊन आलो आहे. तक्रार माझी आहे़ असे म्हणून जोरात ओरडले तसेच मारण्यासाठी फिर्यादीच्या अंगावर धावून गेले. आणि शासकीय कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक म्हस्के तपास करत आहेत.