पुणे : कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या मदतीला पुणे महापालिका सरसावली असून, महापालिकेने १७ पिण्याच्या टँकरसह २७ जणांचे पथक कोल्हापूरला रवाना केले आहे.
मुसळधार पावसामुळे कोकणबरोबरच, सांगली, कोल्हापूर सर्व भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका प्रशासनाच्या विनंती नुसार, पुणे महापालिकेकडून पाणी पुरवठयासाठी १७ पाण्याचे टॅंकर तसेच पाणी पुरवठा सुरळीत करण्यासह, इतर महत्वाच्या कामांमध्ये मदत करण्यासाठी २७ जणांचे पथक पाठविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली.
कोल्हापूरच्या काही भागातील जलशुद्धीकरणाचे काही प्लांटस बंद पडले असून, पंपिंग स्टेशन मध्ये पाणी घुसून पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे जलकेंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेस मदत करण्याबरोबरच, इतर कामांसाठी २१ सुपरवायझर तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी कोल्हापूरला पुढील आठवडाभर राहणार आहेत. आज हे पथक कोल्हापूरला पोहचले असून, त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय कोल्हापूर महापालिकेकडून करण्यात आली आहे.
या आपत्ती काळात पुणे महापालिकेकडून मदतीची परंपरा कायम ठेवली असून, आवश्यकतेनुसार व मागणीनुसार आणखी मदत पुणे महापालिकेकडून देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.