पुणे: महापालिकेच्या शाळांमधील मुलींना सॅनिटरी नॅपकिन विनामुल्य देण्यास स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. पुढच्या टप्प्यात नॅपकिन्स शास्त्रीय पद्धतीने नष्ट करणारी यंत्रणाही शाळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात १३ ठिकाणी मोबाईल टॉयलेट सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. नगरसेविका व महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले व मनिषा लडकत यांनी त्यांच्या समितीत हा प्रस्ताव मंजूर करून स्थायी समितीकडे पाठवला होता. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ११ ते १९ वयोगटांतील २५ हजार ८६४ विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन विनामुल्य उपलब्ध होणार आहेत. दर महिन्याला प्रत्येक मुलीला आठ नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी ४९ लाख ६५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अस्मिता योजनेच्या धर्तीवर ही योजना महापालिकेने सुरू केली आहे. याशिवाय पीएमपीएलच्या बसमध्ये बदल करून शहरात १३ ठिकाणी मोबाईल टॉयलेट सुरू करण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली. यासाठी महापालिका पीएमपीएलला २५ लाख ३३ हजार ५७२ रुपये अदा करणार आहे. पीएमपीएलच्या ताफ्यातून कमी करण्यात येणाºया बसगाडीचा यात वापर करण्यात येणार आहे. त्यात बदल करण्याचा खर्च सीएसआर मधून होणार आहे. महापालिकेने पीएमपीएलला बससाठी म्हणून ही रक्कम दिली आहे. याआधी १० बस अशा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या स्वच्छतागृहाची समस्या दूर करण्यात यश आले आहे. नव्याने हे टॉयलेट बसवण्यात येणाºया जागा याप्रमाणे, सिंध सोसायटी, आयटीआय रोड, संभाजी पार्क, सिमला आॅफिस, शनिवारवाडा, राजारामपूल, सनसिटी, बाणेर, फुलेनगर, चव्हाण शाळा, बिबवेवाडी, विश्रांतवाडी आहे.
मनपा शाळेतील मुलींना मिळणार दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 7:41 PM
नॅपकिन्स शास्त्रीय पद्धतीने नष्ट करणारी यंत्रणाही शाळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय शहरात १३ ठिकाणी मोबाईल टॉयलेट सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
ठळक मुद्देस्थायी समितीची मान्यता : मोबाईल टॉयलेट सुरू करणारराज्य सरकारच्या अस्मिता योजनेच्या धर्तीवर ही योजना महापालिकेतर्फे सुरू