पुणे: शहरामधील वाढती कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यास महापालिका सक्षम असून पहिल्या कोरोना लाटेप्रमाणेच दुसऱ्या कोरोना लाटेवरदेखील नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महापालिका उपाय योजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे महानगरपालिकेने बाणेर येथे २१२ बेड्सचे कोव्हीड रुग्णालय तयार होणार आहे. यासाठी महापौर निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
बाणेर येथील सर्व्हे क्र. ३३ येथे पुणे महापालिकेच्या आरक्षित जागेत २१२ बेड्सचे कोविड रुग्णालय साकारत असून याचा आढावा महापौर मोहोळ यांनी पदाधिकारी, अधिकारी आणि नगरसेवकांसमवेत घेतला आहे. त्यानंतर ते बोलत होते. या कोविड रुग्णालयात १५० ऑक्सिजन बेड्स आणि ६२ आयसीयू बेड्स असणार आहेत. कमीत कमी कालावधीत हे हॉस्पिटल सुरु केले जाणार आहे. या पाहणी वेळी आयुक्त विक्रम कुमार, सभागृहनेते गणेशजी बिडकर ,स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, बाबुराव चांदेरे ,प्रल्हाद सायकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, दुसऱ्या लाटेच्या काळात स्वाभाविकपणे कोरोना रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने व्यवस्था व व्यवस्थापन वाढवण्याची जबाबदारी महापालिका कार्यतत्परतेने पार पाडत आहे. पहिल्या लाटेचा सामना करण्यासाठी बाणेर भागात अद्ययावत कोव्हीड रुग्णालय महापालिकेने सुरू केले होते. एक वर्ष अत्यंत चांगली सुविधा व उपचार या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना देण्यात येत आहेत. महापालिकेचे हे एक मोठे यश असून समाधानाची बाब देखील आहे. त्याच धर्तीवर बाणेरमध्ये सर्व्हे क्र. ३३ येथे आता दुसरे कोविड हॉस्पिटल महापालिका उभारत आहे. बाणेर येथील दुसरे कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असून लवकरच अद्ययावत २६२ बेडचे हॉस्पिटल बाणेर भागामध्ये उभारले जाईल. हॉस्पिटल उभारणीसाठी आवश्यक तो सर्व निधी महापालिकेने तरतूद केला असून महापौर निधीतून निधी देण्यात आला आहे, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.
बाणेरमध्ये ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट उभारणार
बाणेरमध्ये साकारत असलेल्या दुसऱ्या कोविड रुग्णालयात १ हजार एलपीएम या क्षमतेचे चार ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिवाय या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन टॅंकचीही उभारणी केली जात आहे. तसेच वातानुकूलित इमारतीसह सीसीटीव्हीदेखील यात समाविष्ट करण्यात आले आहेत. अशीही माहिती मोहोळ यांनी दिली आहे.