पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा पुणे महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४ शाळा ही लवकर पालिकेकडे हस्तांतरीत केल्या जाणार आहेत. महापालिकेने बिंदू नामावली (रोस्टर) अंतिम करून शासनाकडे पाठवली आहे. त्याला लवकरच अंतिम मान्यता मिळेल. त्यानंतर महापालिका पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३५५ भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे.
जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर शाळा पालिकेकडे वर्ग होत असतात. १९९९ मधील अध्यादेशानुसार शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी हे सर्वच घटक पालिकेत समाविष्ट करणे अनिवार्य आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा पुणे महापालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या आहेत. उर्वरित ४ शाळा ही लवकर पालिकेकडे हस्तांतरीत होणार आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांची बिंदू नामावली तयार करण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाले आहे. यानंतर बिंदू नामावली राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. राज्य शासनाकडे पाठवलेल्या बिंदू नामावलीपैकी (रोस्टर) उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची बिंदू नामावली शासनाने मंजूर केली आहे. तर मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांची बिंदू नामावली येत्या काही दिवसात मंजूर होण्याची शक्यता आहे.
पालिकेकडे शिक्षकांच्या ६५५ जागा रिक्त आहेत . मात्र रजा निवृतीमधील ९३ शिक्षक आणि जिल्हा बदली मधील शिक्षक पालिकेकडे आले आहेत. त्यामुळे पालिकेला ३५५ शिक्षकांची भरती करावी लागणार आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलकडे मागणी नोंदविणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सांगितले.