पुणे : पुणे महापालिकेचा शनिवार वाडा ते विश्रामबागवाडा या हेरिटेज वॉकला चांगला प्रतिसाद मिळत असताना आता सिंहगड किल्ला, आंबेगावमधील शिवसृष्टी येथे सिग्नेचर वॉक सुरू करणार आहे. शहरातील विविध भागातील पर्यटकांना स्वारगेट येथून वातानूकुलित मिनी बसदारे ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी लवकरच सिग्नेचर वॉक सुरू होणार आहे.
पुणे शहराचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व याची ओळख विद्यार्थी, नागरिक आणि पर्यटकांना व्हावी या उद्दिष्टाकरता पुणे महापालिकेने संयुक्त सहभागातून हेरिटेज वॉक उपक्रम सुरू केला आहे. शनिवार वाडा ते विश्रामबागवाडा या ऐतिहासिक वस्तू दरम्यानची बारा ऐतिहासिक ठिकाणी पायी फिरून या उपक्रमातून दाखवली जात आहे. त्यात आता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या संकल्पनेतून दुसरा हेरटेज वॉक सिंहगड किल्ला आणि आंबेगाव येथील शिवसृष्टी हा सुरू करण्यात येणार आहे. हा सिग्नेचर वॉकची आज चाचणी घेण्यात आली. या डेमो वॉकमध्ये पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते, शाखा अभियंता दीपक बारभाई आणि गाईड डॉ. अजित आपटे सहभागी झाले होते.
पुणे शहरात देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि पुणे शहरातील नागरिकांसाठी सिग्नेचर वाॅकचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी स्वारगेट येथून या वॉकसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परदेशी पर्यटकांना हॉटेलमधून या सिग्नेचर वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सकाळी साडेसहा वाजता सुरू होणाऱ्या या वॉकमध्ये सिंहगड किल्ला व त्यावरील ऐतिहासिक ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. पालिकेने नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ सुशोभीकरणाचे काम केले आहे. या ठिकाणी पर्यटकांना सुविधा पुरवण्यासाठी समाधी स्थळाच्या दर्शनी भागामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये लवकरच काम करण्यात येणार आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधी स्थळाचे जतन आणि संवर्धन करण्याचे कामही करण्यात येणार आहे. सिंहगड किल्ल्यावर दिशादर्शक बोर्ड बसविण्यात येणार आहेत. सिंहगड किल्ल्यानंतर या सिग्नेचर वॉकमध्ये आंबेगाव येथील शिवसृष्टी दाखविण्यात येणार आहे. उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी हेरिटेज वॉक डॉट पीएमसी डॉट गव्ह डॉट इन ही लिंक असून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.