पुणे : पुणे महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये अपेक्षित पटसंख्या नाही व तरीही ते वर्ग चालू आहेत, अशा २० शाळांचे विलिकरण करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थी पटसंख्येची तपासणी केली असता, कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण त्याच इमारतीतील प्राथमिक शाळांमध्ये करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे पटसंख्या कमी असलेल्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा पालिकेचा खर्चही वाचणार आहे़. तसेच सद्यस्थितीला एकाच इमारतीत सकाळ व दुपार सत्रातील शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये या विलिकरणामुळे मुख्याध्यापक नियुक्त करता येणार आहे़. तसेच जास्तीत जास्त शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध होणार असून, एका इमारतीत दोन सत्रात शाळा न ठेवता एकच शाळा केल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययनाचे तासही वाढविता येणार आहे़. या निर्णयामुळे शहरातील महर्षीनगर येथील संत नामदेव प्राथमिक विद्यालय, भैरोबानाला येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालय, वानवडी येथील अमृता शेट्टीबा दशावतारी विद्यालय, नगर रोड खुळेवाडी येथील सन सेनापती जनरल अरूणकुमार वैद्य प्राथमिक विद्यालय, ढोले पाटील रस्ता येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, विश्रामबागवाडा येथील राजमाता जिजाबाई प्राथमिक विद्यालय येथील २२ शाळांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे़. तसेच या विलिनीकरणानंतर या ठिकाणी १ मुख्याध्यापक, २० उपशिक्षक, ६ बालवाडी शिक्षिका, ७ बालवाडी सेविका व ५ नवीन शिपाई मिळणार आहेत.
सीएसआर मार्फत सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन घेण्यास मान्यतापुणे शहरात दररोज दोन हजार ते बाविसशे मेंट्रिक टन कचरा जमा होत असून यामध्ये सॅनिटरी वेस्टचे प्रमाण सुमारे १२५ मेट्रिक टन आहे़ अशा सॅनिटरी वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी उपलब्ध यंत्रणा कमी पडत आहे़. त्यामुळे आता पुणे शहरामध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन व इन्सिनेरेशन युनिट देखभाल दुरूस्तीसह ५ वर्षांसाठी सीएसआर मार्फत, फायनान्शियल चार्जेस तसेच युजर चार्जेसमार्फत यंत्रणा उभारण्यासाठी अॅक्शन कमिटी अगेन्स्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस पुणे यांच्याशी करारनामा करण्यास आजच्या स्थायी समितीत मान्यता देण्यात आली़.