पुणे : बालभारती - पौड रोड केला तरी विधि महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार नाही, असे महापालिकेच्या सल्लागारांनीच नमूद केले आहे. त्याकडे दुर्लक्ष करत प्रत्यक्ष जागेवर जाऊन कसलीही पाहणी न करता या प्रस्तावित रस्त्यावर अडीचशे कोटींचा चुराडा करण्यात येणार आहे, असे स्पष्ट मत महापालिकेने स्थापित केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रशांत इनामदार यांनी व्यक्त केले.
सजग नागरिक मंचाच्या वतीने रविवारी १९५वी मासिक सभा झाली. त्यात बालभारती-पौड रोडचा सुधारित प्रस्ताव खरोखर वाहतूक कोंडी कमी करेल का? या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी आदी उपस्थित हाेेते.
इनामदार म्हणाले की, या प्रस्तावित रोडवर आतापर्यंत तीनदा अहवाल झाला. सुधारित अहवालात आमचे मत न घेताच प्रस्ताव रेटला जात आहे. प्रस्तावित रोड झाल्यानंतर किती टक्के लोक वापर करतील, त्याविषयी आकडेवारीच पालिका देत नाही. कदाचित तो आकडा पुरेसा नसल्याने ते सांगत नाहीत. महापालिका अधिकारी काहीही विचार न करता केवळ प्रस्ताव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा काहीही अभ्यास झालेला नाही. रस्ता ३० मीटर करणार आहेत. एवढा मोठा रस्ता का केला जातोय, याविषयी विचारले तर त्यावर काहीच उत्तर दिले जात नाही.
कोंडीत भर पडणार की फुटणार?
रस्ता केला तर सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक पौड रस्त्यावर जाणार, तिथे तेवढी सुविधा आहे का, ती वाहने तिथे पोहोचणार आहेत. बरं हे सेनापती बापट रस्त्यावरून उड्डाणपूल करणार आहेत. त्यामुळे आताच्या रस्त्यापेक्षा आणखी रस्ता कमी होणार आहे. मग कोंडीत भर पडणार की सुटणार? याविषयी अभ्यास न करता अधिकारी अडीचशे कोटींचा चुराडा करणार आहेत.
रस्ता केल्यामुळे परिसरातील आर्थिक घटकाचा विकास होणार असल्याचे अहवालात नमूद आहे. जागेच्या किमती वाढणार का? नेमके यासाठी हा पूल तयार केला जात आहे का? हास्यास्पद असा हा अहवाल असून, तो भयानक आहे, अशी खंत इनामदार यांनी व्यक्त केली.
प्रस्तावित रोडचा वापर किती होणार?
२०३० - २३ टक्के
२०५० - ४७ टक्के
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडला, तिथे आता अवस्था काय आहे ते आपण पाहत आहात. त्यानंतर नळ स्टॉपचा पूल बांधला. त्यामुळे वाहतूक कोंडीचा बोजवारा उडाला. शहरातील एकही प्रस्ताव नीट केलेले नाहीत. मग त्यात ही भर टाकली जात आहे.
- प्रशांत इनामदार, सदस्य, तज्ज्ञ समिती