पुणे : महापालिकेच्या शाळेत इयत्ता दहावी आणि बारावीत शिक्षण घेणाऱ्या ४ हजार २२४ विद्यार्थ्यांचे १८ लाख ६२ हजार ३०५ रुपये परीक्षा शुल्क आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे हे शुल्क भरण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समिती पुढे ठेवला आहे. महापालिका या वर्षापासून प्रथमच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणार आहे.
पुणे महापालिकेचे ४३ माध्यमिक विद्यालय आणि ५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या शाळांमध्ये दहावी आणि बारावी वाणिज्य, विज्ञान शाखेचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दहावी व बारावी शिकणारे विद्यार्थी स्वतः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडे परीक्षा शुल्क भरीत होते. मात्र, पुणे महापालिकेने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क स्वत: भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिकेच्या २०२२-२३च्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
बारावी वाणिज्य शाखेच्या प्रति विद्यार्थ्यांसाठी ४५० रुपये आणि विज्ञान शाखेच्या प्रति विद्यार्थ्यास प्रॅक्टिकल्स ५१० रुपये आणि परीक्षा शुल्क ४९५ रुपये शुल्क बोर्डाला भरावे लागणार आहे. महापालिकेच्या येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भवानी पेठ येथील श्रीमती सावित्रीबाई फुले प्रशाला, कै. बाबूराव सणस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भवानी पेठेतील रफी अहमद किडवाई उर्दू विद्यालय, येरवडा येथील स्वा. से हकीम अजमल खान उर्दू विद्यालय या पाच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही ४३० आहे. या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कासाठी २ लाख ३०८५ रुपये खर्च येणार आहे.
महापालिका म्हणते...
- महापालिकेच्या ४३ माध्यमिक शाळांमधून दहावीचे ३,७९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दहावीची परीक्षा ही बारावीच्या परीक्षेनंतर होणार आहे. दहावीच्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ४३५ रुपये परीक्षा शुल्क आहे. तंत्र शाळेत ९९ विद्यार्थी असून, परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी ५२५ रुपयेप्रमाणे ५१ हजार ९७५ रुपये असा खर्च येणार आहे.
- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ लाख ५९ हजार ३०० रुपये, तर बारावीच्या ४३० विद्यार्थ्यांसाठी २ लाख ३ हजार ०८५ असा एकूण खर्च १८ लाख ६२ हजार ३०५ रुपये परीक्षा शुल्क महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे भरण्यास मान्यता देण्याच्या प्रस्ताव महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी स्थायी समिती पुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.