पुणे: वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमन करताना तासंतास रस्त्यावर उभे रहावे लागते. ऊन, वारा, पावसापासून बचाव करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा पुण्यात नाही. यासाठी म्हणून पुणे महापालिकेकडून १०० बुथ वाहतुक पोलिसांसाठी उभारून देण्यात येणार आहेत. त्यातील १० बुथ शहरातील वेगवेगळ्या चौकात बसवण्यात आले असून, हे बुथ फुटपाथवर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी हे बुथ लावण्यात आले आहेत, त्या ठिकाणाहून वाहतूक नियमन सोडाच; पण महापालिकेने केलेल्या स्मार्ट फुटपाथवर मात्र अडथळ्याची भर पडली आहे. हे बुथ महापालिकेने दिले असले तरी त्याला अद्याप अतिक्रमण विभागाची मान्यता मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस चौका-चौकात उभे असतात. या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेने चौका-चौकात बुथ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हे बुथ शहरात पीएमपीच्या पास केंद्राप्रमाणे आहेत. ही संकल्पना चांगली असली तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना बसावे लागणार आहे. त्यामुळे हे बुथ ज्या ठिकाणी लावले जातील त्या ठिकाणाहून पुर्ण चौकाचे निरिक्षण होणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात हे बुथ फुटपाथवर लावण्यात आले असल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे महानगरपालिकेकडून हे बुथ देण्यात आले असून, पालिकेकडूनच त्यांच्या जागा ठरवण्यात आल्या आहेत. सध्या आम्हाला १० बूथ मिळाले असून, गणेशोत्सवानंतर आणखी ९० बुथ शहराच्या प्रमुख चौकांमध्ये बसवले जातील. - राहूल श्रीराम, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा