पुणे : दहा पथकांकडून १६६९ होर्डींगवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत होर्डिंग कोसळल्यावर पुणे महापालिकेलाही जाग आली आहे. पिंपरी-चिंचवड पालिका परिसरातील किवळेजवळ होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. याच अपघातातील तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे महापालिकेच्या हद्दीत अधिकृत होर्डिंग्जची संख्या २ हजार ४८५ आहे, तर अनधिकृत होर्डिंग्जची संख्या २ हजार ६२९ आहे. त्यामुळे शहरात अधिकृतपेक्षा अनधिकृत होर्डिंग्जची संख्या जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स बोर्डचा शहराला पडलेला विळखा अधिकाधिक घट्ट होत असताना महापालिका केवळ कारवाईचा दिखावा करीत होती. पण आता पालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे.
पुणे महापालिकेत ३४ गावे समाविष्ट झाली आहेत. या गावांच्या समावेशाने पुणे ही क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका झाली आहे. शहरात अधिकृत २ हजार ४८५ हाेर्डिंग्ज आहेत. याव्यतिरिक्त सर्व होर्डिंग्ज अनधिकृत आहेत. आकाशचिन्ह विभागाने अशा अनधिकृत हाेर्डिंग्जच्या विराेधात कारवाईला सुरुवात केली आहे.
पाऊणकाेटीचा दंड वसूल...अनधिकृत होर्डिंग्जवर पालिकेने एकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा ते तिथेच लावले जाते. अशा अनधिकृत होर्डिंग्जविरोधात महापालिका पोलिसांकडे तक्रार करते. त्यानुसार पालिकेने पोलिसांकडे ४९३ पत्रे पाठविली आहेत. आतापर्यंत ५०८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केल्यानंतर ५० हजार रुपयांचा दंड जाहिरात फलकधारकांकडून वसूल करण्यात येतो. आतापर्यंत ७४ लाख ९७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.