पुणे : फेब्रुवारीत होणाऱ्या पुणे महानगपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे जोरदार तयारीनिशी उतरणार आहे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यावर मनसे लक्षकेंद्रित करणार आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. कालपासूनच त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान बैठकीत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
ठाकरे म्हणाले, पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटीच्या पुढे गेले आहे. पण त्यातून नागरिकांना काय सुविधा मिळाल्या ? एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठे गेला याची माहिती घेऊन सत्ताधारी भाजपने काय केले याची पोलखोल करा. तसेच आगामी महापालिका निवडणूकीसाठी आपापल्या वॉर्डाचे संघटन मजबूत करा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी बुधवारपासून विधानसभा मतदारसंघनिहाय शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. पहिल्या दिवशी कसबा, पर्वती व हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक मतदारसंघाची किमान दीड ते दोन तास बैठक घेऊन चर्चा केली, पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे हे देखील ऐकून घेतले. दरम्यान, राज ठाकरे यांच्याशी थेट संवाद साधता आल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला होता.
''आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना होईल की वॉर्ड रचना याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, मनसेने वॉर्ड रचनेला महत्त्व देऊन त्याच पद्धतीने संघटनेचे सर्व पदे भरावीत. गेल्या पाच वर्षात प्रत्येक प्रभागात कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत, महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटीच्या पुढे गेले आहे. पण त्या प्रमाणात काम झालेले दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक भागाची माहिती काढून स्टिंग ऑपरेशन करा असे आदेशही त्यांनी बैठकीत दिले आहेत.