पुणे: पुणे शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामध्ये ८५ ते ९० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहे. अशा रुग्णांवर आणि त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी पीएमसी होम आयसोलेशन अँप तयार करण्यात आले आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या अँपचे उदघाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आदी उपस्थित होते.
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. पुणे शहरातही कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत कोरोना झपाटयाने पसरत असला तरी लक्षणेविरहित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्या रुग्णांवर घरोघरी जाऊन लक्ष ठेवणे महापालिकेसाठी आव्हानच आहे. अशा वेळी हे अँप विकसित करून गृहविलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
अँपची वैशिष्ट्ये
- गुगल प्ले स्टोअर वरती पीएमसी होम आयसोलेशन आयकॉन असणारा अँप डाउनलोडसाठी तयार करण्यात आला आहे. - रुग्ण मोबाईल जवळ ठेवून घरापासून वीस मीटरहून अधिक अंतरावर गेल्यास त्वरित कंट्रोल रूमला सतर्कतेचा इशारा मिळणार आहे. - रुग्ण ऑक्सिजन, ताप, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन अँपमध्ये करू शकणार आहे. - अँपवरून स्वतःच्या मदतीसाठी रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो. हा संदेश प्रभाग निहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोहोचल्यावर रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल. - अँपच्या डॅशबोर्डवर आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यावरून येथील प्रभाग निहाय कॉल सेंटर टीम त्या रुग्णाला कॉल करेल. - सतर्कतेच्या इशाऱ्यावर जर प्रक्रिया झाली नाही. तर नोटिफिकेशनद्वारे संबंधित उच्च अधिकाऱ्यांना याची माहिती मिळेल. - रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर आणि रुग्णाची कोरोना लक्षणे वाढल्यास सतर्कतेचा इशारा दोन्ही कंट्रोल रूमला जाईल.