पुणे : महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयास लवकरच स्वत: ची सुसज्ज अशी इमारत मिळणार असून, त्या इमारतीच्या १४७ कोटी रुपयांच्या खर्चाला शुक्रवारी मान्यता देण्यात आली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्ग सध्या कमला नेहरू रुग्णालय आणि बाबूराव सणस कन्या शाळेच्या आवारात भरत होते. प्रथम वर्षाचे वर्ग सुरू झाल्यावर लवकरच दुसऱ्या वर्षाचे वर्ग व नवीन प्रथम वर्षाचे वर्ग कुठे भरणार, महाविद्यालयाची स्वत: ची वास्तू कधी होणार असे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात होते. मात्र आज महाविद्यालयाच्या इमारतीला मान्यता देण्यात आल्याने हे प्रश्न निकाली निघाले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र इमारत आणि ५०० बेडसचे रुग्णालय व वसतिगृह उभारण्याचे नियोजन आहे. नायडू रुग्णालयाच्या आवारात महाविद्यालयाची शैक्षणिक इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय व तत्सम आवश्यक विभागांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही इमारत महापालिका बांधणार असून, यासाठीच्या १४७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. याकरिता लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
दरम्यान सध्याचे डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय बाणेर येथील पहिल्या कोरोना रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या दीड वर्षात महाविद्यालयाची सुसज्ज अशी इमारत अस्थित्वात येणार आहे.